नगराध्यक्षांचा गंभीर आरोप : मारहाण प्रकरणाला राजकीय वळण, इशाऱ्यावर होतो खेळगोंदिया : सध्या गाजत असलेल्या गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या वादात आता नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी उडी घेत मुख्याधिकारी मोरे हेच कामांचे कमिशन मागत असल्याचा गंभीर आरोप पत्रपरिषदेत केला.यावेळी नगर परिषदेचे गटनेता दिनेश दादरीवाल, नगरसेवक शिव शर्मा, घनश्याम पानतवने हेसुद्धा उपस्थित होते.दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाबद्दल आपली बाजू मांडताना नगराध्यक्ष जयस्वाल म्हणाले, मुख्याधिकारी मोरे यांना आपण सकाळी १० वाजता आमसभेची तारीख निश्चित करण्यासाठी बोलविले होते. ते अर्ध्या तासात पोहोचतो असे वारंवार सांगत होते. मात्र प्रत्यक्षात दुपारी ३ वाजता पोहोचले. एवढेच नाही तर आपल्यावर ते भडकले आणि मी कोणाच्या बापाचा नोकर नाही, अशा शब्दात त्यांनी सुनावले, असे जयस्वाल यांनी पत्रकारांना सांगितले.नगरसेवकांकडून आलेले प्रस्ताव आमसभेत ठेवण्याबद्दल त्यांना सांगितले असता मुख्याधिकाऱ्यांनी भडकून आमसभेत प्रस्ताव ठेवण्याच्या बदल्यात पैशाची मागणी केल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला. यावेळी जयस्वाल यांच्यासह स्वीकृत नगरसेवक शिव शर्मा हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनी या कथित मारहाणीबद्दल बोलताना सांगितले की, मुख्याधिकाऱ्यांवर झालेला हा हल्ला हा प्रत्यक्ष झालेलाच नसून ही सर्व रचलेली कहाणी असल्याचे ते म्हणाले. वास्तविक भाजपला बदनाम करण्यासाठी रचलेले हे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले.रामनगर पोलिसांनीही याप्रकरणी पक्षपातीपणा केल्याचा आरोप जयस्वाल व शर्मा यांनी लावला. मुख्याधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून शिव शर्मा यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी जातात. मात्र नगराध्यक्षांच्या तक्रारीवरून कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही. या प्रकाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडेही करण्यात आली असल्याचे यावेळी दादरीवाल यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनीच भडकावले असाही आरोप त्यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)मुख्याधिकारी मोरे यांच्या निलंबनाची मागणीगोंदिया नगर परिषदेत भाजपा आणि सहयोगी शिवसेनेचे मिळून १९ सदस्य आहेत. तर कांग्रेस-राष्ट्रवादी आणि सहयोगी सदस्य २१ आहेत. पत्र परिषदेत मुख्याधिकाऱ्यांवर भाजप-सेनेच्या १९ सदस्यांना दबावात ठेवण्याचा आरोप करीत ते मनमानी पद्धतीने आणि असंवैधानिक पद्धतीने वागत असून त्यामुळे त्यांना निलंबित करण्याची मागणी केली जाणार असल्याचे सांगितले. यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांना बदलविण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक शिष्टमंडळ भेटले होते. परंतू त्यात त्यांना यश आले नाही. पत्रपरिषदेत माहिती देताना सांगण्यात आले की, आता दिल्ली आणि मुंबईत तुमचे सरकार असतानाही आपली बदली करण्याची ताकद त्यांच्यात नाही. वास्तविक मुख्याधिकाऱ्यांचा गोंदिया येथील कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली कधीही होऊ शकते. एवढेच नाही तर येथील वातावरणामुळे आता ते स्वत: येथे राहण्यास इच्छुक नसून बदलीची वाट पाहात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली तर तो त्यांचा विजय असेल की भाजपा पदाधिकाऱ्यांचा, अशा चर्चेला ऊत येत आहे.
मुख्याधिकाऱ्यांनीच मागितले कमीशन!
By admin | Updated: June 13, 2015 00:54 IST