रावणवाडी : धान उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादित माल बाजार पेठेतील दरापेक्षा कमी भावात व्यापारी खरेदी करतात. रासायनिक खताच्या किमतीही आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी उत्पादन खर्च कमी करण्याच्या बेतात आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्याच्या पर्याय म्हणून शेण खताच्या वापरावर ते जास्त भर देताना दिसून येत आहेत.भरघोस उप्तन्नासाठी शेतकरी आजही शेण खताचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आवश्यक असणारे सेंद्रिय घटक शेतातच असतात. त्यामुळे शेण खताची मागणी वाढली आहे. यावेळी विविध कंपन्यांच्या रासायनिक खताचे दर गगणाला भिडले आहेत. या खताचा उपयोग शेतकऱ्यांच्या बजेट बाहेर जात आहे. ग्रामीण भागात पाळीव जनावराची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शेण खत मिळणे दुरापास्त झाले आहे. पूर्वीच्या काळात शेताला शेणखत भरपूर प्रमाणात मिळावे म्हणून शेतकरी गाई म्हशी व शेळ्या पाळायचे. मात्र आता चारा-पाणी मिळत नसल्यामुळे जनावरांची निगा राखणे शेतकऱ्यांना कठिण झाले आहे. त्यामुळे शेतकरी आज यांत्रिकी शेतीकडे वळला आहे. पूर्वी शेतकऱ्यांना मशागतीकरिता कित्येक दिवस लागायचे. मात्र आता ही मशागत यांत्रिकी पद्धतीने काही तासातच पूर्ण होते. परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांची विक्री केली. आता मोजकीच जनावरे शेतकरी बाळगत आहेत. त्यामुळे शेणखताचे उत्पन्न कमी होवून भाव वाढले आहेत. सेंद्रीय शेती करण्यासाठी शेणखताला अनन्यसाधारण महत्व आहे. मध्यंतरीच्या काळात शेतात रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केला जात होता. त्यामुळे जमिनीचे पोत बिघडले. आता त्यात सुधारणेसाठी पुन्हा शेतकरी शेणखताचा वापर करु लागले आहेत. त्यामुळेच आता शेणखताची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कृषीचे चक्र हे पशूंशी निगडीत आहे. मात्र गेल्या काही वर्षात हरितक्रांतीने नवीन तंत्रज्ञानाच्या नावाखाली परंपरागत पद्धतीला छेद दिला. काही वर्ष रासायनिक खताच्या मदतीने बऱ्यापैकी उत्पन्नही मिळाले. मात्र जमिनीची सुपीकता धोक्यात आल्याने आता पुन्हा उत्पादकांना शेणखताची आठवण होत आहे. (वार्ताहर)पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे काळाची गरजरावणवाडी : मानवी जीवन व पर्यावरणाचे अनन्यसाधारण संबंध आहे. पर्यावरणाशिवाय मानवी जीवनात संपन्नता येवू शकत नाही. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जीवनाचा नाश अटळ आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी उपाययोजना करणे आवशक आहे.जीवनसृष्टीचा आधारस्तंभ पर्यावरण आहे. अनेक उपद्रवी कृत्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे निदर्शनास येते. मात्र यावर आळा घालण्यासाठी कसलीही उपाययोजना केली जात नाही. वनातील वृक्ष हेच मानवाचे नातलग आहेत, असा मंत्र संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दिला. त्यामुळे आधुनिक काळात होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून त्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी जिथे घनदाट अरण्ये होती, तिथे आता वृक्ष विरळ होवून लोकवस्ती वसलेली आहे. मानवी जीवन वृक्षांवर अवलंबून आहे, हे मानवाला कळत असूनही त्यांना वळत नाही. त्यामुळेच वृक्षतोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते. (वार्ताहर)
रासायनिक खताचे दर आवाक्याबाहेर
By admin | Updated: June 23, 2014 23:58 IST