बोंडगावदेवी : गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीने गावकऱ्यांच्या सहकार्याने विकासात्मक कामे करावी. गावाशेजारच्या जंगलाचे रक्षण करण्यासाठी स्वत:ची नैतिक जबाबदारी समजून पुढे यावे. वनाची जोपासना करण्यामध्येच गावकऱ्यांचे हित आहे. वनविभागाच्या वतीने देण्यात येणारा निधी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी उपयोगात आणावे, असे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी सी.जे. रहांगडाले यांनी केले. निमगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात छोटेखानी कार्यक्रम घेवून संयुक्त वन व्यवस्थापन समितीला धनादेश सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास गायकवाड, अर्जुनी-मोरगावचे वनपरिक्षेत्राधिकारी सी.जे. रहांगडाले, ग्राम विकास अधिकारी आर.जी. गणवीर, वनरक्षक भुरे, एच.एम. पंधरे, अशोक डुंभरे प्रामुख्याने उपस्थित होते. निमगाव येथील गावकरी व ग्रामपंचायतच्या वतीने सन १९७२ मध्ये गावाच्या शेजारी सागाचे रोपवन लावण्यात आले होते. सदर रोपवनाची जोपासना व देखभाल ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली होती. गावाच्या सभोवताल जवळपास २५ हजार सागांची झाडे उभी होती. सन १९९१ मध्ये ग्रामपंचायत स्तरावरून सागवान रोपवनाची कटाई करण्यात आली. कापलेल्या झाडांचा ग्रामपंचायतच्या वतीने लिलाव करून रक्कम गोळा करण्यात आली. लिलावापोटी मिळालेल्या रकमेचा उपयोग गावाच्या विकास कार्यासाठी त्यावेळी करण्यात आला होता. गावाच्या सहकार्याने सागवान रोपवनाची जिवापाड देखभाल करून मोठे झाड होईपर्यंत जोपासना करण्यात आली. सन २०१२ मध्ये आलेल्या वादळाने मोठ्या प्रमाणात सागवान झाडे कोसळून पडले. सर्व झाडे ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आले. अखेर वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास गायकवाड यांनी वनविभागाशी संपर्क साधून लिलावाची परवानगी मागितली. काही वर्षांनी वनविभागाने ७ डिसेंबर २०१५ रोजी लाकडांचा लिलाव केला. लिलावापोटी वनविभागाला प्राप्त झालेल्या रकमेचा २ लाख ३५ हजार ३०० रुपयांचा धनादेश बुधवार (दि.९) ग्रामपंचायत कार्यालयात संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास गायकवाड, सरपंच देवाजी डोंगरे यांना वनपरिक्षेत्राधिकारी सी.जे. रहांगडाले यांनी सुपूर्द केला. (वार्ताहर)
वन व्यवस्थापन समितीला धनादेशाचे वाटप
By admin | Updated: March 11, 2016 02:26 IST