लूट प्रवाश्यांची भाग-२देवरी : देवरी ते आमगावकडे जाणाऱ्या एसटी बसेसच्या भाड्यामध्ये विसंगती आहे. आमगावच्या आंबेडकर चौक, नवीन बस स्थानक व जुन्या बस स्थानकाचे दरपत्रकानुसार वेगवेळे भाडे आहेत. मात्र एकसारखेच भाडे घेण्यात येत असल्याचा आरोप देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी केला आहे. जैन यांनी २७ जानेवारी २०१५ रोजी राप भंडाराचे विभागीय नियंत्रक यांना लेखी आवेदन देवून देवरी ते आमगावकडे जाणाऱ्या प्रवाशांकडून आमगावच्या आंबेडकर चौक, नवीन बस स्थानक व जुन्या बस स्थानकाच्या थांब्यानुसार भाडे आकारण्याचे निवेदन केले होते. यावर विभागीय नियंत्रकांनी रापच्या नियमानुसार आमगाव शहरातील नवीन बस स्थानक विचारात घेवून आमगाव येथे भाडे आकारणी करण्यात येते. तसेच जुने बस स्थानक व आंबेडकर चौक येथे प्रवाशांच्या सोयीनुसार केवळ विनंती थांबा देण्यात आल्याची माहिती जैन यांना २८ जानेवारी २०१५ रोजी पत्राद्वारे कळविली. त्यामुळे सदर दोन्ही जागी अधिकृत थांबे नसल्याचे स्पष्ट होते. परंतु विभाग नियंत्रक भंडारा यांनी चुकीची माहिती देवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नरेश जैन यांनी केला आहे. देवरी ते आमगाव मार्गावरील तिकीट दर व टप्पे यानुसार दरपत्रकात आमगावच्या तिन्ही ठिकाणचे वेगवेगळे दर असल्याचे जैन यांचे म्हणणे आहे. मुल्ला-लोहारा-सावली-हरदोली व पुढील सर्व गावांतून (केवळ देवरी, बोरगाव व वडेगाव वगळता) आंबेडकर चौक आमगावचे तिकीट दर वेगवेगळे आकारून आंबेडकर चौकाचीच तिकीट देण्यात येते. तर आमगावच्या नवीन बस स्थानकाचे दर वेगळे आकारून आमगावच्याच नवीन बस स्थानकाची तिकीट प्रवाश्यांना देण्यात येते. तसेच परतीच्या प्रवासामध्येही हीच बाब लागू करण्यात येते. त्यामुळे केवळ देवरी, बोरगाव व वडेगाववरून आंबेडकर चौक आमगावला जाणाऱ्या व तेथून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठीच हा नियम आहे काय, असा प्रश्न जैन यांनी उपस्थित केला आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नरेश जैन यांनी केली आहे. (प्रतिनिधी)