कॉंग्रेस अनु.जाती विभागाची मागणी : राष्ट्रपतींना पाठविले निवेदन गोंदिया : उत्तरप्रदेश राज्यातील सहारनपुर येथे दलीत समाज बांधवांची अमानूष हत्या करण्यात आली असून उत्तर प्रदेश सरकार व केंद्र सरकार आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेस अनु.जाती विभागाने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतीने निवेदन पाठविण्यात आले. सहारनपूर येथे दलीत हत्याकांडाच्या पाच घटना घडल्या आहेत. असे असतानाही उत्तरप्रदेश राज्य सरकार आरोपींना पाठीशी घालत आहे. ही अत्यंत खेदजनक बाब असून या घटनांत सुमारे १०० आरोपींची सीबीआय चौकशी करून विशेष न्यायालयात खटला चालविण्यात यावा. तसेच ६० दिवसांच्या आत निकाल लावून हत्याकांडात भयभीत दलितांचे पुनर्वसन करून आर्थिक मदत करावी अशी मागणी कॉंग्रेसच्या अनु. जाती विभागाने केली अहे. अन्यथा राज्य व देशात आंदोलन करण्यात येण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना अमर वऱ्हाडे, लक्ष्मीकांत दहाटे, कृष्णा शहारे, खेमराज साखरे, सुनील शहारे, उत्तम साखरे, नीरज धमगये, कुणाल भालेकर व अन्य उपस्थित होते.
सहारनपूर घटनेची सीबीआय चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 00:14 IST