गोंदिया : गोंदियाच्या सिव्हील लाईन येथील इंगळे चौकातील स्वस्त धान्य दुकान क्रं. ४८ मधील रेशन काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना गोंदिया पोलिसांनी ३०० किलो रेशन जप्त केला आहे. रेशन परवाना धारक फरार झाल्यामुळे त्याच्या दुकानाला सिल करण्यात आले आहे. गोंदिया येथील परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक किरण कबाडी, अविनाश काळदाते, सहायक पोलीस निरीक्षक बोरकर व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मागील अनेक दिवसापासून स्वस्त धान्य दुकान क्रं. ४८ येथील रेशन काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. येथील रेशन दुकानदार गोंदियातील रमेश हारोडे या खाजगी किराणा दुकानदाराकडे विक्री करायचा. दररोज सायकल रिक्षाने रेशन रमेश हारोडे यांच्या घरी नेले जात होते. त्याच्या ते रेशन दुसऱ्या पोतीमध्ये बदलून विक्रीकरिता हारोडे यांच्या दुकानात नेले जात होते. याची गुप्त माहिती पोलिसांनी काढली. शनिवारी दुपारी १२ वाजता नेहमीसारखा प्रकार होत असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. एक रिक्षा चालक आपल्या रिक्षामध्ये सहा पोतीमध्ये गहू, तांदूळ भरून हारोडे यांच्या घरी घेऊन गेला. स्वस्त धान्य दुकानापासून तर हारोडे यांच्या घरापर्यंत पोलीस साध्या गणवेशात त्याचा पाठलाग करीत होते. हारोडे यांच्या घरी रेशन उतरविल्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर रमेश हारोडे याच्या बाजार परिसरातील दुकानाची झडती घेतली. त्यात रेशन सारखा असलेला ३४ पोती माल त्यांच्या दुकानात आढळल्यामुळे ते अन्नधान्य दुकानातून इतरत्र हलवायचे नाही अशी ताकीद पोलिसांनी हारोडे यांना दिली. कारवाई झाल्याची बाब रेशन दुकानदारांच्या कानावर पडताच त्याने दुकानाला कुलूप लावून पसार झाला. ही कारवाई दुपारी १२.३० ते २ वाजता दरम्यान करण्यात आली. रमेश हारोडे यांच्या दुकानातील मालाची पाहणी करून पोलीस कारवाई करण्यासाठी सिव्हील लाईन येथील रेशन दुकानदाराकडे दिले असता दुकान बंद आढळले. घरच्यांनी तो नागपूरला गेल्याचे सांगितले. पुरवठा निरीक्षक ठाकरे, नायब तहसीलदार पवार व पोलिसांनी सदर दुकानाला रात्री झाल्यामुळे सिल ठोकले. रेशन दुकानदार सोमवारपर्यंत पोलिसांना न मिळाल्यास पंचासमक्ष त्या रेशन दुकानाचे कुलूप तोडून पंचनामा करण्यात येईल, रेशनच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात येईल यात दोषी आढळल्यास रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल. सदर कारवाई पोलीस अधिक्षक शशीकुमार मिना यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
काळ्या बाजारात जाणारा रेशन पकडला
By admin | Updated: September 21, 2014 23:52 IST