गोंदिया : चार नगर पंचायतींच्या निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना इच्छुक उमेदवारांनी बुधवारी नामांकन दाखल करण्यासाठी एकच झुंबड केली. यावेळी शासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. अखेर शेवटचे दोन दिवस आॅफलाईन नामांकन दाखल करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. एवढेच नाही तर दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५.३० पर्यंत नामांकन भरण्याची वेळ वाढविण्यात आली आहे.नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ८ आॅक्टोबर आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या तीन प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार ठरले नव्हते. काही पक्षांनी रात्री उमेदवार जाहीर केले. त्यामुळे बुधवारी नामांकनासाठी त्यांची झुंबड उडाली. जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी आणि गोरेगाव या चार नगर पंचायतींमध्ये ही निवडणूक होत आहे. आॅनलाईन नामांकनासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असली तरी उमेदवार कालपर्यंत आॅनलाईन नामांकन भरण्यासाठी सरसावलेले दिसले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळण्याची वाट अनेक जण पाहात होते. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर नाराज कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातून उमेदवारी मिळवून आव्हान उभे करतील म्हणून उमेदवारी जाहीर केली नव्हती.
नामांकनासाठी उमेदवारांची झुंबड
By admin | Updated: October 8, 2015 01:28 IST