गोरेगाव : कोरोनासारख्या महाभयंकर आजाराने सर्व जनता त्रस्त असताना महावितरणने भरमसाठ वीजबिल देऊन सर्वसामान्यांना मोठा ‘शॉक’ दिला. वीजबिलात सवलत देऊ, असे आश्वासन देऊन महाविकास आघाडी सरकारने शब्द फिरवला व जनतेचा विश्वासघात केला. आता राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना वसुलीकरिता नोटीस पाठवून पठाणी वसुली सुरू केली आहे. शासनाने अशाप्रकारे नोटीस देणे त्वरित थांबवावे व दिलेल्या नोटीस रद्द करून जनतेचा छळ थांबवावा. तसेच लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांसाठी भाजपकडून येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारचा निषेध नोंदविणारे व मागण्यांचे फलक हातात घेऊन घोषणा दिल्या व मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले. यावेळी आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार खोमेश राहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, रेखलाल टेंभरे, डाॅ. साहेबलाल कटरे, गिरधारी बघेले, महामंत्री इसुलाल सोनवाने, आशिष बारेवार, हिरालाल रहांगडाले, दिलीप चौधरी, संजय बारेवार, सीता रहांगडाले, रेवेंद्रकुमार बिसेन, सुरेश रहांगडाले, विश्वजीत डोंगरे, गुड्डू कटरे, डाॅ. लक्ष्मण भगत, बबलू बिसेन, पंकज रहांगडाले, चित्रकला चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.