आमगाव : येथील गोंदिया रोडवरील कॉलनीत कालव्याचे पाणी शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाघ सिंचन व्यवस्थापनअंतर्गत कालव्याचे पाणी धान पिकांकरिता सोडण्यात आले होते. पण कॉलनीत पाणी जमा झाल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे .
एकीकडे पाणी टंचाईच्या परिस्थितीत पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भात कालव्याच्या पाण्याचे नियोजन नसल्याने धरणाचे पाणी निरर्थक वाहत आहे. यावेळी शाखा अभियंत्यांनी निरर्थक पाणी वाहत असल्याने बंधाऱ्यातील पाणी अडवून ज्या शेतात पाण्याची गरज आहे तेथे पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी कॉलनीतील लोकांच्या घरी शिरत आहे.
५ ते ६ दिवसांपासून येथील घरात पाणी वाहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्प तसेच इतर जलचर प्राणी व पक्षी वावरत असतात. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील परिसरात पूर आल्यासारखी स्थिती तयार झाली असून, जागोजागी पाणीच पाणी वाहत असल्याने कॉलनीला तलवाचे स्वरूप आले आहे.