गोदाम भाडे प्रलंबित : भरडाईत मात्र आघाडी, बोनससह चुकारेही झालेगोंदिया : शेतकऱ्यांकडून शासनाच्या हमीभावानुसार खरेदी केलेला धान साठविण्यासाठी जिल्हाभर मार्केटिंग फेडरेशनने जवळपास २०० गोदाम भाड्याने घेतले आहेत. मात्र सन २००९-१० पासून गोदाम मालकांना त्याचे भाडेच देण्यात न आल्याने मागील वर्षी गोदामांची समस्या उत्पन्न झाली होती. जवळपास साडेचार कोटी रूपये गोदामांचे भाडे शिल्लक असल्याने यावर्षी मार्केटिंग फेडरेशनला गोदाम उपलब्ध होतील किंवा नाही, या समस्येला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागणार आहे.सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने एकूण सात लाख ४३ हजार ७६५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी खरीप हंगामात चार लाख ३२ हजार ९६२ क्विंटल जनरल तर ए ग्रेडचा ७०२ क्विंटल धान खरेदी करण्यात आला. उन्हाळी हंगामात ३ लाख १० हजार १०१ क्विंटल धान खरेदी झाली. या संपूर्ण धानाची भरडाई करण्यात आली असून शेतकऱ्यांना बोनस अनुदानासह धानाचे चुकारेसुद्धा १०० टक्के करण्यात आल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा व्यवस्थापक खर्चे यांनी दिली.मागील वर्षी ए गेडच्या धानाचे दर एक हजार ४१० रूपये तर सी ग्रेडच्या धानाचे दर एक हजार ३६० रूपये होते. यंदा दोन्ही प्रकारच्या धानाच्या दरात अवघी ५० रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार यंदा ए ग्रेडच्या धानाचे दर एक हजार ४६० रूपये तर सी ग्रेडच्या धानाचे दर एक हजार ४१० रूपये प्रतिक्विंटल राहणार आहे.विशेष म्हणजे यावर्षी राईस मिलर्सच्या मागणीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने शासनाने भरडाई खर्च १० रूपये प्रतिक्विंटलवरून वाढवून ४० रूपये प्रतिक्विंटल केला आहे. (प्रतिनिधी)धान खरेदीचा आदेश नाहीजिल्ह्यात काही दिवसातच धान विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र शासनाचा आदेश मिळत नाही तोपर्यंत धान खरेदी केंद्र उघडण्याच्या प्रक्रियेबाबत काहीही सांगता येत नसल्याचे मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उल्लेखनिय म्हणजे शेतकऱ्यांचे धान विक्रीसाठी उपलब्ध झाल्यावरही शासनाच्या वतीने हमीभाव धान खरेदी केंद्रे उघडले जात नाही किंवा विलंबाने उघडले जातात. याचा फायदा व्यापारी उचलून अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांचे धान खरेदी करतात. मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केलेला धान साठविण्यासाठी खासगी गोदामांशिवाय पर्याय नाही. मात्र गोदाम मालकांचे पाच वर्षांत भाडे देण्यात आले नसल्यामुळे मागील वर्षी गोदाम मालकांनी गोदाम देण्याचे नाकारले होते. परंतु यंदासुद्धा गोदामांचे गाडे देण्यात न आल्याने यावर्षी ते आपले गोदाम देतील का? असा प्रश्न मार्केटिंग फेडरेशनपुढे निर्माण झाला आहे.
धान खरेदीचे पुन्हा वांदे
By admin | Updated: October 14, 2015 02:22 IST