रावणवाडी : मार्च महिन्यापासून पुन्हा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसेसला राज्यात प्रवेश बंद केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेलेल्या मजुरांना गोंदिया येथून बसेस बंद असल्याने पायीच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
मागील आठवडाभरापासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहे. मध्य प्रदेशाची सीमा महाराष्ट्राला लागून असल्याने गोंदिया येथे रेल्वे गाड्याने येणारे मजूर पायीच मध्य प्रदेशात जात आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या सीमेवरील रजेगावजवळ मोठ्या प्रमाणात पायी जाणाऱ्या मजुरांचे जत्थे दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद, नागपूर या शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. होळी सणानिमित्त सध्या ते आपल्या गावाला जात आहे. पण बससेवा बंद असल्याने ते पायीच आपले गाव गाठत आहे. मागील वर्षी सुध्दा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने त्यांना पायीच आपले गाव गाठावे लागले होते. तेव्हा देखील हजारो किमीचा प्रवास करुन मजूर वर्ग आपल्या गावी परतला होता. तीच स्थिती यंदा बसेस बंद असल्याने पुन्हा निर्माण झाली आहे.
..........
खासगी वाहनांचे दर चारपट
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे एक महत्वपूर्ण स्थानक असून या रेल्वे स्थानकावर दररोज मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील मजूर परतत आहे. मात्र त्यांना आपल्या गावी परत जाण्यासाठी बसेसची सोय नसल्याने खासगी वाहने भाड्याने घेऊन ते गावी परतत आहे. मात्र या संधीचा फायदा खासगी वाहन चालक घेत त्यांच्याकडून चारपट वाहने भाडे घेत असल्याचे चित्र आहे.
.........
रजेगाव सीमेपर्यंत सोडण्यासाठी २०० रुपये भाडे
गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेशाची सीमा लागून आहे. रजेगावनंतर मध्य प्रदेशाची सीमा सुरु होत असल्याने तिथपर्यंत सोडून देण्यासाठी ऑटोचालक प्रवाशांकडून प्रती व्यक्ती दोनशे रुपये भाडे घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रवाशांना भुर्दंड बसत आहे.