सावरा पिपरीया मार्ग खड्ड्यात: विद्यार्थी व नागरिकांची अडचणइंदोरा-बुजरूक : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी वरून ४ किमी असलेल्या वैनगंगा नदी काठावरील सावरा-पिपरीया या गावांपर्यंत तिरोडा आगाराची एसटी धावत होती. परंतु हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने २७ सप्टेंबरपासून बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे या गावामधील नागरिक व विद्यार्थी फार अडचणीत आले आहेत. अर्जुनीपासून सावरा पिपरिया या गावाचे ४ ते ५ किमीचे अंतर आहे. हा रस्ता सार्वजनिक विभागाचा डांबरीकरणाचा होता. जिल्हाधिकारी व उत्खनन विभाग पिपरीया नदी काठावरील रेतीचा लिलाव मागील उन्हाळ्यात केला. भरपावसाळ्यात या रस्त्यावरून रेती ठेकेदारांनी रेतीची वाहतूक केली. रेतीच्या ओव्हरलोड वाहनांमुळे पाच किमी चा रस्ता पूर्णत: खराब झाला. या रस्त्यावरून पायी चालणारा व्यक्ती बरोबर चालू शकत नाही. चार चाकी वाहन व दुचाकी वाहन चालणे कठीण आहे. या खराब रस्त्यावरूनच रेती वाहतूक सुरू ठेवली आहे. एसटी वाहक व चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. यात कधीही धोका होऊन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागू शकतो. यामुळे एसटी आगार तिरोडा यांनी २६ सप्टेंबरला ग्रामपंचायत पिपरीयाला रस्ता खराब संदर्भात पत्र देऊन २७ तारखेपासून दिवसातून एसटी होणाऱ्या ४ फेऱ्या बंद केल्या आहेत. यामुळे या भागातील प्रवाशी नागरिक व विद्यार्थी अडचणीमध्ये आले आहेत. तिरोडा ते अर्जुनी सावरा पिपरीया हा मार्ग रहदारीचा मार्ग आहे. पिपरीया ते अर्जुनी या गावापर्यंत लोकांची सतत ये जा असते. अर्जुनी हे गाव व्यापार व सर्व बाबतीत उपयुक्त ठिकाण आहे. शाळा, दुकान, औषधी, दवाखाने या सर्व कामासाठी नागरिकांना यावे लागते. परंतु रस्त्याअभावी या गावाशी संपर्कच तुटला आहे. रेतीच्या वाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. पूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून कोणतेही वाहन चालू शकत नाही. तरी पण रेती ठेकेदारांनी रेतीची वाहतूक बंद केली नाही. ग्रामपंचायतकडून रेती ठेकेदारांना सूचना दिल्या. परंतु आमचा रेती घाट ३० सप्टेंबरपर्यंत आहे. आम्ही रेती नेणारच असे सांगून ट्रक मधून रेतीची वाहतुक होत आहे. या रेती वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांना जीव मुठीत घेऊन ट्रक चालवावे लागत आहे. केव्हाही मोठा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाधिकारी गोंदिया व उत्खनन विभाग गोंदिया यांनी रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करून येथील प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लावाव्यात. बस फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी पिपरीया, सावरा, अर्जुनी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
खराब रस्त्यामुळे बसफेऱ्या बंद
By admin | Updated: October 3, 2016 01:35 IST