देवानंद शहारे - गोंदियाप्रवाशांची वाढती संख्या बघता अनेक बाबतीत राज्य परिवहन महामंडळाचे मरारटोली येथील गोंदिया बसस्थानक तोकडे पडत होते. केवळ सहा फलाटांवरून बसेस सुटत होत्या. आता नवीन सात फलाट तयार करण्यात आले असून एकूण १३ फलाटांवरून बसेस सुटत आहेत. आता पुन्हा पुढील सहा महिन्यांच्या आत या बसस्थानकात विविध सोयी-सुविधा पुरवून हे बसस्थानक अत्याधुनिक करण्यात येणार आहे. यावर जवळपास १४ लाखांचा खर्च केला जाणार असल्याचे आगार व्यवस्थापक जी.एन. शेंडे यांनी सांगितले. या बसस्थानकावर सध्या एका फळविक्रेत्याला जागा देण्यात आली आहे. शिवाय चहा-नास्त्यासाठी एका कॅन्टीनची सोय करण्यात आली आहे. ही कॅन्टीन जुनी असून तिला विस्तृत स्वरूपात जानेवारी महिन्यापर्यंत सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एलसीडी टीव्ही लावण्यात येणार आहे. स्थानकावर गुन्ह्याच्या घटना घडू नये, प्रत्येक हालचाल टिपता यावी यासाठी स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसेच जिल्हा वाहतूक अधिकारी (डीटीओ) यांच्या कार्यालयाची व्यवस्था बसस्थानकात करण्यात येणार आहे. या सर्व बाबी पुढील सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. सध्या या बसस्थानकावर फळविक्रेता, चौकशीसाठी दूरध्वनी सेवा, सायकल स्टॅन्ड, पार्सल सेवा व कॅन्टीनची सोय आहे. येत्या सहा महिन्यांत प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टिने या बसस्थानकाला अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे आगार व्यवस्थापक जी.एन. शेंडे यांनी सांगितले. या बस स्थानकावरील नवीन फलाटांना विनाउद्घाटनानेच प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे. आता सात नवीन फलाटांवरून बसेस सोडल्या जात आहेत. नवीन फलाट उपलब्ध झाल्यामुळे बसांना कोणत्या दिशेत कोणत्या प्लॅटफॉर्मवरून सोडावे, ही एक मोठीच समस्या निर्माण झाली होती. परंतु आगार व्यवस्थापकांनी यावर मार्ग काढला. नवीन फलाटांवरून बालाघाट, कामठा, आमगाव, दासगाव, डांगोर्ली, काटी, दवनीवाडा, तिरोडा, तिरोडा मार्ग ते भंडारा, नागपूरसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे.
बसस्थानक होणार अत्याधुनिक
By admin | Updated: November 27, 2014 23:36 IST