नागरिकांना मनस्ताप : शासकीय सेवेचा ग्राहकांना बसतोय फटकाआमगाव : दुरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून कार्य करणाऱ्या बीएसएनएल कंपनीच्या सेवेला विविध प्लॅनमुळे ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ही सेवा व्यवस्थित व नियमित मिळत नाही. मोबाईल सेवेत अनेक अडथळे येत असून इंटरनेट सेवेची गतीसुद्धा मंदावली आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळेच आमगावच्या बीएसएनएल सेवेत अनियमितता असल्याचे बोलले जात आहे.दुरसंचार क्षेत्रात मोठे संशोधन झाल्याने दिवसेंदिवस ही सेवा अपडेट होत आहे. या क्षेत्रांमध्ये बीएसएनएलसोबत अनेक खासगी कंपन्यादेखील काम करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे बीएसएनएलसह खासगी कंपन्यादेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करीत आहेत. मोबाईलच्या पूर्वी लँडलाईन सुविधा फक्त बीएसएनएल कंपनीकडेच होती. त्यामुळे साहजिकच या कंपनीकडे मोठा ग्राहक वर्ग जुळला गेला. त्याचप्रमाणे बीएसएनएल कंपनी ही शासकीय कंपनी असल्याने विश्वासनिय व आपुलकी म्हणून ग्राहकांची ओढ या कंपनीकडे जास्त होती. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यात बीएसएनएल कंपनीच्या ग्राहकांची संख्या अधिक आहे.आजच्या आधुनिक युगात मोबाईल व इंटरनेट अत्यावश्यक सेवा झाल्या आहेत. गरजेमुळे या क्षेत्रातील विविध कंपन्यात मोठी स्पर्धा सुरु आहे. जास्तीतजास्त ग्राहक आपल्या कंपनीकडे यावे यासाठी खासगी कंपन्याकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोयी-सुविधा व सवलती देण्यात येत आहे.या तुलनेत बीएसएनएलच्या ग्राहकांना सोयी व सुविधा अपुऱ्या पडत असल्याने दिवसेंदिवस ग्राहक संख्या रोडावत चालल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावात अजूनही बीएसएनएल मोबाईलचे ‘कव्हरेज’ व्यवस्थित मिळत नाही. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवासुद्धा व्यवस्थित मिळत नाही. अनेकदा इंटरनेट जोळणी झाल्यानंतर वारंवार बंद पडते. इंटरनेटची गतीसुद्धा इतर कंपन्याच्या तुलनेत कमी आहे. लँडलाईन सेवादेखील वारंवार खंडित होत असते. अशा प्रकाराबाबत ग्राहकांनी संबंधित कार्यालयात तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीची दखल घेतल्या जात नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. अनेक ग्राहकांनी बीएसएनएलकडे आॅनलाईन तक्रारीसुद्धा केल्या. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत अपेक्षित कार्यवाही केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडूनच अभय देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बीएसएनएलची सेवा अनियमित
By admin | Updated: July 2, 2015 01:51 IST