गोंदिया : मार्च क्लोजिंग जवळ आली असल्याने नगर परिषद कर विभागाचे पथक पुन्हा एकदा जोमात आले असून, मंगळवारी (दि. ३०) पथकाने बीएसएनएलच्या सिव्हिल लाइन्स परिसरातील इमारतीला पुन्हा एकदा सील ठोकले आहे. थकीत कराचा भरणा न केल्याने या इमारतीवर दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे, तर अन्य २ रहिवासी घरांनाही पथकाने सील केले आहे.
नगर परिषद कर विभागाच्या पथकाने यापूर्वी डिसेंबर महिन्यात बीएसएनएलच्या इमारतीला सील ठोकले होते. त्यांच्यावर सन २०१८-१९ पासून पाच लाख ५० हजार ७८२ रुपयांची थकबाकी असल्याने ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते व त्यांना ३० दिवसांत कराचा भरणा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने इमारतीचे सील उघडण्यात आले होते. मात्र त्यानंतर आतापर्यंत कराचा भरणा न करण्यात आल्याने पथकाने मंगळवारी (दि. ३०) इमारतीला पुन्हा एकदा सील ठोकले.
एवढेच नव्हे तर, शहरातील चंद्रशेखर वॉर्डातील भोजराज ठाकरे यांच्यावर सन २००३ पासून एक लाख ३९ हजार १३८ रुपये थकून असल्याने त्यांच्या घरालाही सील ठोकण्यात आले. तसेच आझाद वॉर्डातील गोविंद सदाशिव मेश्राम यांच्यावर सन २०११ पासून ७३ हजार १६४ रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचेही घर सील करण्यात आले आहे.