आमगाव : गोरठा ते रिसामा यातील अंतर दोन किमी आहे. जुना ब्रिटीशकालीन पांदण रस्ता असल्याने येथे डांबरीकरण करण्यात आले. याच मार्गावर चारी (पाणी वाहून जाणारे लहान पूल) पुलाची मागणी शेतकरी शामराव बहेकार यांनी केली आहे. जिल्हा परिषद व जि.प. बांधकाम विभाग यांना २१ आॅगस्ट रोजी रिसामा येथील गावकऱ्यांनी लेखी निवेदन दिले. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे सह्या आहेत. गोरठा-रिसामा हा मार्ग सन १९९८-९९ ला खडीकरण व नंतर डांबरीकरण करून बनविण्यात आला. सन २००८-०९ मध्ये किडंगीपार नाल्यावर मोठा पूल तयार करण्यात आला. सदर कामात आ. गोपालदास अग्रवाल यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. याच मार्गावर रिसामा गावाला लागून रेल्वे मार्ग आहे. शेतकऱ्यांची या रेल्वे फाटकेवरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक पाठपुराव्यानंतर या रेल्वे फाटकाला रेल्वेचे वरिष्ठ मुख्य अभियंता नागपूर यांनी भुयारी पुलाची मागणी मंजुरी केली व कामातील अडथळा दूर झाला. मात्र भविष्यात या गोरठा-रिसामा मार्गावर वाढती रहदारी लक्षात घेता चारी पूल बनविणे गरजेचे आहे. तेव्हा जिल्हा परिषद व बांधकाम विभागाने त्वरित चारी पुलास मंजुरी प्रदान करावी, अशी लेखी निवेदनासह मागणी शेतकरी शामराव बहेकार, संजय बहेकार, कृष्णा कोरे, किशोर चुटे, चैतराम रहांगडाले, एस.एम.चंद्रिकापुरे, सी.जे. मानकर, नरेश हुकरे व अन्य ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
गोरठा-रिसामा मार्गावर पुलाची मागणी
By admin | Updated: September 26, 2015 01:59 IST