आत्महत्या की हत्या? : तपासाचे आव्हानदेवरी : येथील वॉर्ड क्रमांक १ मधील रहिवासी शैलेश हरिचंद चांदेवार (३२) या युवकाचा मृतदेह धुकेश्वरी मंदिराच्या मागील भागात झाडावर टांगलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना शनिवारच्या सकाळी ७ वाजतादरम्यान उघडकीस आली. त्याची हत्या की आत्महत्या ही बाब स्पष्ट झाली नसली तरी हत्याच असण्याची शक्यता असल्याचा संशय परिसरात व्यक्त होत आहे.शनिवारच्या सकाळी काही लोक आपल्या शेताकडे जात असताना त्यांना मंदिराच्या मागील भागात एक मोटारसायकल उभी दिसली. त्या मोटारसायकलपासून २०० मीटर अंतरावर कुंभीच्या झाडावर युवकाचे शरीर दोराने लटकलेले दिसले. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतल्यानंतर त्याची ओळख पटली. आमगाव रोडवरील अग्रसेन चौकात शैलेशची चहाटपरी व पानठेला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून त्याचे दुकान बंद असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. तो शुक्रवारी आमगावला जाण्यासाठी आपल्या घरून निघाला होता. परंतु रात्री तो घरी न परतल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले. तेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली. सदर घटना शुक्रवारच्या रात्रीची असावी असा कयास पोलीस लावत आहेत. घटनास्थळाजवळ बियरच्या दोन बॉटल, पाणी पाऊच, मुरमुरे मिळाले. तसेच मृतक शैलेंद्रची मोटार सायकल एमएच ३५/ एक्स ३६८९ ही घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर आढळली. या घटनेला पोलीस आत्महत्या म्हणत आहेत. मात्र नागरिकांना हत्येचा संशय येत आहे. त्याची गळा आवळून हत्या करून नंतर मृतदेह झाडाला लटकविण्यात आला असावा, अशी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
तरूणाचा मृतदेह झाडाला टांगला
By admin | Updated: November 22, 2014 23:03 IST