गोंदिया : गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ओझीटोला शिवारातील वीटभट्टीवर काम करीत असलेल्या ३० वर्षीय परराज्यातील मजुराचा मृतदेह आंब्याच्या झाडाला लटकलेला आढळून आला. ही घटना सोमवार (दि.११) पहाटे ५ वाजता सुमारास उघडकीस आली. सदर मजुराची आत्महत्या की हत्या? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे. मध्य प्रदेशातील अमूली-वाराशिवनी (जि.बालाघाट) येथील दीपक दशरथ उईके (३०) हा पत्नी संपदा दीपक उईके (२५) तसेच चार वर्षीय चिमुकलीला घेवून शुक्ला यांच्या ओझीटोला येथील वीटभट्टीवर मजुरीचे काम करीत होता. नित्याप्रमाणे रविवारी रात्री जेवण करून घरासमोरील झोपडीमध्ये झोपायला जातो, असे पत्नीला सांगून निघाला. मात्र, उशिरापर्यंत झोपेतून उठला नसल्याने पत्नी संपदा उठवियासाठी गेली असता तो आढळला नाही. शोधाशोध केली असता झोपडीजवळील आंब्याच्या झाडाला त्याचा मृतदेह लटकलेला आढळला. सदर घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. माहिती मिळताच त्वरित गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. गंगाझरी पोलिसांनी मर्ग दाखल केला. मात्र दीपकची हत्या की आत्महत्या? अशा प्रश्नही नागरिकांपुढे उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)
परराज्यातील मजुराचा मृतदेह झांडावर
By admin | Updated: May 13, 2015 01:32 IST