गोंदिया : निवडणूक काळात मतदार चिठ्ठी वाटप करणे, मतदान केंद्रावर पुरेशी व्यवस्था करणे व निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना भत्ता देण्याची तरतूद नसल्याची स्पष्टोक्ती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तिरोडा प्रवीण महिरे यांनी दिली आहे. त्यामुळे बीएलओंमध्ये नैराश्य पसरले असून त्यांनी निवडणूक कामासाठी स्वतंत्र भत्ता देण्याची मागणी केली आहे.मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना निवडणूक काळातील कामाचा स्वतंत्र भत्ता देण्यात यावा अन्यथा यापुढे निवडणूक काळात कुठलेही काम न करण्याचा ईशारा तिरोडा विधानसभा मतदार संघातील बीएलओ यांनी दिला आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार लोकप्रतिनिधी नियम १९५० च्या भाग १३ नुसार मतदार यादीविषयक कामांसाठी शासनातर्फे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात येते. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे, आक्षेप, दुरूस्ती, स्थलांतरीत, मयत, दुबार मतदारांची नावे वगळणे, यादी अद्यावत करणे यासारखी कामे बीएलओकडे असतात. त्यासाठी त्यांना वार्षिक मानधन दिले जाते. परंतु निवडणूक काळात त्यांच्याकडे कोणतेही कामे राहत नव्हती. मात्र लोकसभा निवडणूक २०१४ पासून निवडणूक काळातील मतदान केंद्राचा संपूर्ण भार बीएलओंवर टाकण्यात आलेला आहे. निवडणूक काळात मतदार चिठ्ठ्यांचे घरोघरी जाऊन व्यक्तीश: वाटप करणे, स्वाक्षरी घेणे, तसा वारंवार अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणे, मतदान केंद्रावर सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करणे, निवडणुकीच्या दिवशी पूर्णवेळ मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांची ओळख पटवून देणे यासारखी अनेक वाढीव कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली आहेत. त्यामुळे बीएलओंची खूप दमछाक होते. मात्र सदर कामाचा कुठलाही स्वतंत्र भत्ता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत न दिल्यामुळे बीएलओंमध्ये नैराश्याचे वातावरण असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
बीएलओ यांना निवडणुकीचा स्वतंत्र भत्ता देण्याची मागणी
By admin | Updated: November 18, 2014 22:58 IST