गोंदिया : ग्रामपंचायत काळातील प्रलंबिल देयक (सुरक्षा ठेव) काढण्यासाठी सालेकसा येतील नगर पंचायतमधील लेखापाल व लेखापरीक्षकाला मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.२१) जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतमध्ये कामबंद आंदोलन केले. तसेच मारहाण करणाऱ्या गु्न्हेगारी वृत्तीच्या कंत्राटदार अर्जुनसिंग संतोषसिंग बैस व त्याचा भाऊ अर्पणसिंग संतोषसिंग बैस यांना काळ्या यादीत टाकून त्वरित अटक करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
कंत्राटदार अर्जुनसिंग बैस व त्याचा भाऊ अर्पणसिंग बैस सोमवारी (दि.२०) सालेकसा येथील नगर पंचायत कार्यालयात गेले व तेथील लेखापाल व लेखापरीक्षक संदीप लहाने यांना ग्रामपंचायत काळातील प्रलंबित देयक काढण्यासाठी दमदाटी केली. एवढेच नव्हे तर दोघांनी लहाने यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेच्या निषेधार्थ नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्यावतीने मंगळवारी (दि.२१) जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतमध्ये कामबंद आंदोलन करण्यात आले. तसेच गु्न्हेगारी वृत्तीच्या अर्जुनसिंग बैस व त्याचा भाऊ अर्पणसिंग यांना काळ्या यादीत टाकून त्वरित अटक करण्याची मागणी जिल्हाधिकारी नयना गुंडे व मुख्याधिकारी करण चव्हाण यांना निवेदनातून करण्यात आली आहे.