गोंदिया : आजघडीला शहरातील रस्ते उखडले असून त्यांच्या या दुर्गतीने शहरवासीयांची चांगलीच कसरत होत आहे. शहरातील प्रत्येकच भागातील ही स्थिती असून एकही भाग रस्त्यांच्या या समस्येपासून सुटलेला नाही. त्यामुळे शहरवासीयांवर आता चांगला रस्ता शोधण्याची पाळी आली आहे. मात्र रस्त्यांच्या या समस्येने शहरवासी त्रासले असून त्यांच्यात रोष व्याप्त आहे. कारण रस्त्यांवरील दचक्यांनी ‘हड्डी-पसली’ एक होत असल्याचे शहरवासी बोलत आहेत. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीयस्तरावर गोंदियाची ख्याती आहे. व्यापार, उद्योग, वनसंपदा व राजकारण या सर्वांचे वरदान गोंदियाला लाभले आहे. मात्र ‘नाम बडे और दर्शन छोटे’ अशी वास्तवीक स्थिती गोंदिया शहराची झाली आहे. अन्य सोयी-सुविधांचे न बोललेलेच बरे, मात्र रस्त्यांच्या बाबतीत एखाद्या गावापेक्षाही गचाळ स्थिती शहराची झाली आहे. आजघडीला शहरातील एकाही भागात चांगला रस्ता दिसून येत नाही. चांगल्या रस्त्यांचे जाळे पसरविण्याची गरज असताना शहरात उखडलेल्या रस्त्यांचे जाळे पसरविले जात असल्याचे रस्त्यांची स्थिती बघून बोलावे लागत आहे. शहरातील रस्त्यांची एवढी दुर्गत झाली आहे की, शहरवासीयांना पाय ठेवणे कठीण झाले आहे. वाहनांनी तर सोडाच पायी चालणेही धोकादायक झाले आहे. कारण कोण कधी कोणत्या खड्डयात जावून पडेल याचा नेम राहिलेला नाही. शहरावर दिग्गज राजकारण्यांची सावली आहे. असे असतानाही शहरातील रस्त्यांची स्थिती बघता असे जाणवत नाही. जिल्ह्याला नक्षलग्रस्त असल्याचा श्राप आहे. मात्र नक्षलग्रस्त भागातील रस्ते चांगले गुळगुळीत असून त्या भागाचा श्राप फक्त गोंदिया शहराच्या वाट्याला आल्याचे भासते. शहरातील सिव्हील लाईन्स परिसराची तर व्याख्याच येथील रस्त्यांनी बदलून टाकली आहे. येथून ये-जा करणे म्हणजे जीवघेणे झाले आहे. बाजारातही तोच प्रकार असून एकही परिसर रस्त्यांच्या या श्रापापासून सुटलेला नाही. म्हणूनच रस्त्यांच्या दचक्यांनी ‘हड्डी-पसली’ एक झाल्याचे शहरवासी बोलत आहेत. या रस्त्यांची कधी दुरूस्ती होणार व या त्रासापासून कधी सुटका होणार याची वाट शहरवासी बघत आहेत. (शहर प्रतिनिधी)सिमेंट रस्त्यांवर डांबराचा लेपशहरात सध्या एक आगळावेगळा प्रयोग केला जात असल्याचे बघावयास मिळत आहे. त्याचे असे की, शहरातील सिमेंट रस्त्यांवर डांबराचा लेप चढविला जात आहे. आता हा लेप जास्त दिवस टिकणार नाही याबाबत कंत्राटदार व इंजिनीयरच नव्हे सर्वसामान्य माणसाला कळते. नेमका तोच प्रकार शहरात घडत असून डांबराचे कोट उखडून त्यावर खड्डे पडत आहेत. एकंदर, स्थिती अधिकच खराब होत असून त्यावर पैशांचा नासाडा केला जात आहे.
दचक्यांनी ‘हड्डी-पसली’ एक
By admin | Updated: August 29, 2016 00:04 IST