काचेवानी : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथील रहिवासी कापड विक्रेता भरत हलकामसिंह बसोने (३५) यांचा मृतदेह विद्युत खांबाला दोराने लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यामुळे हत्येचा संशय निर्माण होवून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र ती हत्या नसून अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीपोटीच भरतने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात मृतकासह महिला व अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धापेवाडा ते लोधीटोलाच्या मध्यभागी मुरदाड्यावरुन काही अंतरावर मृतदेह आढळल्याची घटना घडली. २ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता भरत घरी होता. नंतर सायंकाळी ६ वाजतादरम्यान तो मुरदाडा बाजारचौकात लोकांना दिसला. मात्र रात्री भरत घरी आला नाही. त्यामुळे खांबावर लटकलेला मृतदेह भरत बसोने याचाच असल्याचे तर्कवितर्क केले जात होते. घरगुती वादामुळे भरतने आत्महत्या केली नसून हत्याच करण्यात आली, अशी लोकांत चर्चा होती.सदर प्रकरणाचा तपास गंगाझरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरेपाटील आणि दवनीवाडा ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षकांनी पोलीस हवालदार व पोलीस शिपायांच्या सहकार्याने केली. दोन्ही दिशेने तपासचक्र सुरु करण्यात आले. दरम्यान हे प्रकरण हत्येचे नसून भरत बसोने याने अनैतिक संबंधाच्या बदनामीच्या भीतीने आत्महत्या केल्याचे उघड झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरे पाटील यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, भरत बसोने (३५) याचा गावातीलच एका ४८ वर्षांच्या वयस्कर महिलेशी अनैतिक संबंध जुडले होते. यापूर्वी या महिलेचा दुसऱ्या एका इसमासह अनैतिक संबंध होते. त्या महिलेच्या या दोन्ही प्रियकरांची एकत्र भेट झाली. दोघांच्या चर्चेतून पूर्वीचा प्रियकर रामू (काल्पनिक नाव) याने भरत बसोनेला खोटी व बनावटी गोष्ट तयार करुन सांगितली की, ज्या महिलेशी तुझे अनैतिक संबंध आहेत, त्या महिलेशी आतापर्यंत माझे संबंध होते. ती महिला माझ्यापासून गरोदर आहे. आता मी सोडलो, मात्र गरोदर असल्याने तुझे नाव समोर येणार आहे.या प्रकरणाने भरत बसोने याला आता आपली बदनामी होण्याची भीती सतावू लागली. बदनामीच्या भीतीतून वाचण्याकरिता त्याने आत्महत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने आत्महत्या करण्याकरिता दोराचा उपयोग केला. तो दोर ज्या दुकानातून खरेदी केला, त्या दुकानदाराने सदर दोर आपल्या दुकानातून मृतक भरतने स्वत: खरेदी करून नेल्याचे बयानात नोंदविले आहे.भरत बसोने याने थोडे डोके लावले असते तर मरणागती गेला नसता, अशी चर्चा आहे. ती महिला गरोदर असल्याचे जुन्या प्रियकराने सांगितले होते. मात्र ती महिला वयोवृद्ध अर्थात ४८ वर्षाच्या जवळपास असल्याने संतती होण्याची शक्यता नव्हती. जुना प्रियकर व सदर महिलेने हा प्रकार कबुल केला आहे. दवनीवाडा पोलिसांनी कलम ३०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बदनामीच्या भीतीनेच भरतने केली आत्महत्या
By admin | Updated: November 12, 2014 22:46 IST