श्री पद्धत लागवड : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानगोंदिया : शेतीस वाव देण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सधन श्री पद्धतीवर आधारित पीक प्रात्यक्षिकांचा लाभ देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाला जिल्ह्यातील २०७२ हेक्टरवर पीक प्रात्यक्षिकांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात ०.४० हेक्टरची ५१८० प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून ५१८० शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. पिकांवर जेवढे विविध प्रात्यक्षिके होणार आहेत, तेवढ्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. संकरित भात पीक प्रात्यक्षिकांतर्गत ६७२ हेक्टरवर ०.४० हेक्टरची १६८० प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. पीक पद्धतीवर आधारित पीक प्रात्यक्षिक अंतर्गत ११७६ हेक्टरवर ०.४० आरची २९४० प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत एक हजार रूपये अनुदानावर १० वर्षांच्या आतील भात पिकाच्या वाणावर अनुदान देण्यात येणार आहे. हे महाबीजच्या वाणासाठी २३ हजार ७८० क्विंटलसाठी एक हजार रूपये प्रति क्विंटल राहणार आहे. एकात्मिक मूलद्रव्य व्यवस्थापन अंतर्गत ७०३२ हेक्टरसाठी झिंक सल्फेटचे वाटप प्रति हेक्टरी ५०० रूपये अनुदानावर करण्यात येणार आहे. एकात्मिक किड व्यवस्थापन अंतर्गत भात पीक संरक्षणासाठी ६५९२ हेक्टरवर किड नियंत्रणासाठी औषधे प्रति हेक्टरी ५०० रूपये अनुदान देण्यात येणार आहे. तननाशक व्यवस्थापन अंतर्गत भात पिकातील तन नियंत्रणासाठी ६५९२ हेक्टरवर प्रति हेक्टरी ५०० रूपये अनुदानावर पायरोझो सल्फुरान्स या तननाशकाचे ६५९२ हेक्टरवर वाटप करण्यात येणार आहे.तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी असल्यास सुधारित औजारांमध्ये कोनोविडर, नापसॅक स्प्रेयर, पॉवर स्प्रेअर, पॉवरविडर, ड्रमसिडर, रोटाव्हेटर आणि पंपसंच, भात मळणी यंत्र मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
पीक प्रात्यक्षिक योजनेचा ५१८० शेतकऱ्यांना लाभ
By admin | Updated: June 19, 2014 23:53 IST