लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी शासनतर्र्फे विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करुन त्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवून वर्षभराचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही लाभार्थ्याला योजनेचा लाभ न मिळाल्याने त्यांना धोका पत्थकारुन जीर्ण झालेल्या घरात वास्तव्य करावे लागत आहे.तिरोडा तालुक्यातील भंभोडी येथील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी मनोहर अटराहे यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी २१ आॅगस्ट २०१८ ला ग्रामपंचायत कार्यालय भंभोडीने विशेष ग्रामसभा घेऊन यात त्यांचा प्रस्ताव मंजुर केला. तसेच त्यांच्या नावाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविला. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही.परिणामी मनोहर व त्याच्या कुटुंबीयांना पडक्या घरात वास्तव्य करावे लागत आहे.पावसाळामुळे मनोहरच्या घराची भिंत पडली असून भिंतीऐवजी त्यांनी ताळपत्री लावून ते राहत आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून मनोहरला घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे.
घरकूल योजनेपासून लाभार्थी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 20:51 IST