न्या. शाहीद खान : कावराबांधच्या फिरत्या न्यायालयात कायदेविषयक मार्गदर्शन सालेकसा : हक्कांसाठी धावपळ करीत असताना आपल्याला कर्तव्याचीही जाणीव असली पाहिजे. कोणतीही व्यक्ती आपले कर्तव्य योग्यरीत्या बजावत असेल तर त्याला त्याचे अधिकार आपोआप मिळतात, असे प्रतिपादन आमगाव न्यायालयाचे न्यायाधीश शाहीद खान यांनी केले. ते कावराबांध येथे फिरते न्यायालयाप्रसंगी घेण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. जिल्ह्यात या महिन्यात विविध ठिकाणी लोकअदालती स्वरूपात फिरते न्यायालय आयोजित करुन अनेक प्रकरणाचा ताबडतोब निपटारा करण्यात येत आहे. २१ मार्चला तालुक्यातील कावराबांध येथे ग्रामपंचायत परिसरात फिरते न्यायालय भरविण्यात आले होते. तत्पूर्वी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी न्यायाधीश शाहीद खान होते. मार्गदर्शक म्हणून अॅड. यु.बी. नागपुरे, सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे, सरकारी वकील के.के. चौरसिया, सामाजिक कार्यकर्ते जयश्री पुंडकर, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, विजय मानकर व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी न्यायाधीश शाहीद खान यांनी विविध विषयांवर कायदेविषयक सल्ला दिला. ते म्हणाले, कायद्यानुसार महिलांनासुद्धा पुरुषासारखे अधिकार आहेत, तरी पुरुषांनी महिलांच्या हक्कांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन गटात वाद विकोपाला जाते आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेला तर न्याय मिळो किंवा न मिळो, दोघांचे नुकसानच होते व फायदा कोण्या तिसऱ्याचा होतो. या बाबी लक्षात घेता वाद होऊ नये याचे भान ठेवून काम केले पाहिजे असे सांगून ते म्हणाले, पती-पत्नीच्या मध्ये निर्माण होणारे भांडण हे त्यांच्या दोघांचा संसार उद्धवस्त करणारे असते. म्हणून संसार थाटताना पती-पत्नीने आपसात समन्वय साधावे, असे आवाहन केले. याप्रसंगी अॅड. उत्तम नागपुरे यांनी मौलीक अधिकार आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनीही याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले. या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबलू मच्छिरके, पोलीस पाटील पोषणलाल बनोठे, सर्व ग्राम पंचायत सदस्य व गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात लोक अदालत घेऊन सहा प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. याप्रसंगी न्यायमूर्ती शाहीद यांनी हजर असणाऱ्या दोन्ही पक्षांना योग्यरित्या समजावून सांगितले व पुढे वाद निर्माण घेऊ नये यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला दिला. संचालन व आभार ग्रामपंचायत सचिव रोकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी व्ही.सी. धावडे, व्ही.व्ही. मोहनकर, ए.एस. शेख, जे.एस. खांडेकर, चमन, हटवार, दालचंद मोहारे, युवराज दसरिया, विरेंद्र दसरिया, यादव नागपुरे, मोहन राठी, मयाराम लांजेवार, निर्मल मोहजारे, जागेश्वर दसरिया यांच्यासह पोलीस कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
हक्कांसह कर्तव्याची जाणीव ठेवा!
By admin | Updated: March 23, 2017 01:02 IST