गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी (दि. ७) सहा बाधितांचा मृत्यू झाला तर, ५७१ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. मृत्यू आणि कोरोना रुग्णांचा जिल्ह्यात नवा रेकाॅर्ड झाला असून, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या होय. त्यामुळे आतातरी जिल्हावासीयांनी वेळीच सावध होत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा विस्फोट होण्यास वेळ लागणार नाही.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत आहे. सात दिवसाच्या कालावधीत दोन हजारावर कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती अधिकच बिकट होत चालली असून, गोंदिया तालुका कोरोनाचा हॉटस्पाॅट झाला आहे. सर्वाधिक १४३१ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात आहेत. त्यामुळे गोंदिया शहर आणि तालुकावासीयांनी अधिक जपण्याची गरज आहे. बुधवारी जिल्ह्यात ५७१ बाधितांची नोंद झाली तर, ६ बाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गोंदिया तालुक्यातील तीन, तिरोडा तालुक्यातील दोन आणि सालेकसा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर बुधवारी आढळलेल्या ५७१ रुग्णांमध्ये सर्वाधिक ३०३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ७१, गोरेगाव ७१, गोरेगाव २५, आमगाव २२, सालेकसा २०, देवरी १५, सडक अर्जुनी ७८, अर्जुनी मोरगाव ३३ व बाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,१०,३३३ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ९५,५६२ नमुने निगेटिव्ह आले. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ९५,८९५ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८७,७६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८,२२० कोरोना बाधित आढळले असून, यापैकी १५,६३२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत २,३८६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ८२८ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडूृन प्राप्त व्हायचा आहे.
..............
सप्टेंबर महिन्याचा रेकाॅर्ड मोडला
मागील वर्षी जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. तेव्हा सर्वाधिक ३८० कोरोना बाधितांची नोंद झाली होती. तर यंदा एप्रिल महिन्यात हा रेकाॅर्ड मोडला असून सर्वाधिक ५७१ बाधितांची नोंद झाली. तर एकाच दिवशी सहा कोरोना बाधितांचा मृत्यूदेखील जिल्ह्यात पहिल्यांदाच झाला आहे.
..........
ही जिल्हावासीयांसाठी धाेक्याची घंटा
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. बाधितांच्या संख्येत दररोज दुप्पट वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८५.७९ टक्क्यांवर आला आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.
...........
जिल्हावासीयांनो आता तरी घ्या काळजी
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत असून दररोज नवीन रेकाॅर्ड निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर करून स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी.