दरेकसा : र्देकसा घाटापासून धनेगावपर्यंंत रस्त्याच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या सिमेंटच्या खांबात लोखंडी सळाखींऐवजी चक्क बांबूंचा वापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका वाहनाने धडक देवून या खांबांना तोडले त्यावेळी या बांधकामाची ‘पोलखोल’ झाली.रस्ता बांधकामादरम्यान दोन्हीकडे खांब तयार केले जातात व तेथे सुरक्षेच्या दृष्टीने कठडे लावले जातात. कोणतेही वाहन या कठड्यांच्या घेर्याबाहेर जाऊ नये, हेाच यामागील उद्देश असते. याला सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊल समजले जाते. परंतु बांधकाम विभाग गोंदिया अंतर्गत उपविभाग आमगावकडून र्देकसा घाटापासून धनेगावपर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असताना तयार केलेले सिमेंटचे खांब किती निकृष्ट दर्जाचे आहेत, याची ओळख एका वाहनाने धडक दिल्यानंतर झाली.हे खांब पूर्णपणे तुटल्या गेले. तुटलेल्या खांबांना पाहून तेथे लोखंडी सळाखी दिसणे अपेक्षित होते. परंतु लोखंडाऐवजी तेथे बांबूच्या कमच्याच आढळल्या. यावरून लोखंडाऐवजी या बांधकामात बांबूच्या कमच्यांचाच उपयोग करण्यात आल्याचे स्पष्ट होते. सदर बांधकामात बांबूच्या कमच्यांचा उपयोग का करण्यात आला? तसेच अशा बांधकामाकडे संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष का दिले नाही? यात बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचे संगनमत तर नाही, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. संदर्भात बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, मी कुठे कुठे लक्ष देऊ. बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की, मात्र लोखंडी सळाखींऐवजी बांबूचा वापर करणे गैरकायदेशीर असल्याचे त्यांनी मान्य केले. या प्रकरणी संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी केली आहे. (वार्ताहर)
सिमेंट खांबांमध्ये सळाखींऐवजी बांबू
By admin | Updated: June 9, 2014 23:42 IST