अर्जुनी-मोरगाव : येथील नगर पंचायतच्या अध्यक्ष पोर्णिमा शहारे यांचेवर नगरसेवकांनी आणलेला अविश्वास ठराव बारगळला. शुक्रवारी (दि.१०) घेण्यात आलेल्या विशेष सभेत पाच नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या बाजूने १२ मते पडली. स्थानिक नगर पंचायतमध्ये नगरसेवकांची संख्या १७ आहे. ३ मार्च रोजी १४ नगरसेवकांनी नगराध्यक्षावर अविश्वासाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना ३ मार्च रोजी दिले होते. शुक्रवारी (ता.१०) यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती. या विषयावर चर्चेच्या वेळी १२ नगरसेवक उपस्थित होते. अविश्वास ठराव पारित होण्यासाठी १३ नगरसेवकांची गरज होती. अविश्वासाच्या बाजूने १२ नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. त्यामुळे अध्यक्षाविरुद्धचा अविश्वासाबाबतचा ठराव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियम १९६५ कलम ५५ व ५५(१) अन्वये फेटाळण्यात आला. नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे आहेत. काँग्रेसच्या निर्वाचित सदस्यांनी आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्षाविरुद्ध मतदान केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रकाश शहारे, हेमलता घाटबांधे, शिवसेनेच्या ममता पवार तसेच अपक्ष माणिक घनाडे यांनी मतदानाच्यावेळई अनुपस्थित राहून नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे यांना तारले. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे, नगरसेवक ममता पवार, प्रकाश शहारे, माणिक घनाडे यांनी मुख्याधिकारी किरण बागडे यांना ठरावाची प्रत मागितली. मात्र ठराव पुस्तिकेवर ठराव लिखीत नसल्याने त्या देऊ शकल्या नाही. काही वेळ हे नगरसेवक नगर पंचायत कार्यालयासमोर बसून होते. ठराव प्रक्रियेवर ठराव लिहून पीठासीन अधिकारी अनंत वालस्कर यांचे स्वाक्षरीसाठी नगर पंचायत कर्मचाऱ्यांना रवाना करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
अर्जुनी न.पं.अध्यक्षाविरुद्ध अविश्वास बारगळला
By admin | Updated: March 11, 2017 00:21 IST