नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. याच चाचण्यांदरम्यान तालुक्यातील सिरेगावबांध येथे ७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांची तपासणी करून त्यांना गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
बोंडगावदेवी, निमगाव, भिवखिडकी, चान्ना या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. २३ एप्रिलला सिरेगावबांध येथे रॅपिड अँटिजेन टेस्ट १७ नागरिकांची करण्यात आली. यात ७ कोरोनाबाधित आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ७ अधिकारी-कर्मचारी कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे. नागरिकांनी लस घ्यायला न घाबरता लसीकरण केंद्रांवर येऊन, स्वतःचे लसीकरण करून घ्यावे. लस ही आरोग्याला घातक नाही. तर कोरोना प्रतिबंधासाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करण्यासाठी पुढे यावे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एका प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. तर एक सामुदायिक आरोग्य अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत. अरततोंडी येथे कोरोना चाचणी दरम्यान ४ नागरिक बाधित आढळले. या लसीकरण व कोरोना तपासणी कार्याला प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना बाकटीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता डोंगरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन कुलसुंगे, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी नाकाडे, डाॅ. आरती काळे, बाह्य उपचार आरोग्य सेविका भूमाली उईके, आरोग्य साहाय्यक शेंडे, भारद्वाज, औषधी निर्माता श्रीपत्रे, बाळू झोडे आदी सहकार्य करीत आहेत.
......
बाक्स
जोखमीची कामे देऊ नका
आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारीदेखील बाधित होत आहेत. एक सामुदायिक आरोग्य अधिकारी गर्भवती असतानादेखील त्यांना कोविड केअर सेंटर अर्जुनी मोरगाव येथे सेवा देण्यात आली होती. त्यातच त्या बाधित झाल्याचे समजते. पन्नास वर्षे वयावरील व इतर आजार असलेल्यांना तसेच गर्भवती महिलांना जोखमीची कामे देण्यात येऊ नयेत, असे शासनाचे निर्देश असतानादेखील अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जोखमीची कामे दिली जात आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
-------------