गोंदिया : वर्ग ९ ते १२पर्यंतच्या पाठोपाठ आता वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर बुधवारपासून (दि. २७) सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग ५ ते ८ पर्यंतचे १३ शिक्षक, तर वर्ग ९ ते १२पर्यंतचे २९ शिक्षक म्हणजेच एकूण ४२ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
देशात आता कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. ही दिलासादायक स्थिती बघता शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, अगोदर ९ ते १२पर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच कोरोनाची स्थिती अधिकच नियंत्रणात आल्यानंतर आता २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते व त्यानुसार शिक्षक आपली कोरोना चाचणी करवून घेत आहेत. असे असतानाच मात्र वर्ग ५ ते ८ पर्यंतचे १३ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर वर्ग ९ ते १२ पर्यंतचे २९ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
म्हणजे आजघडीला वर्ग ५ ते १२वीचे एकूण ४२ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वर्ग ५ ते ८पर्यंतच्या ८२९ शाळांत ३३८४ शिक्षक, तर ५३४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. यातील ३१५८ शिक्षक व ४७९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
----------------
सर्वाधिक शिक्षक आमगाव तालुक्यातील
वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू असून, आतापर्यंत ३,१५८ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली असून, त्यात १३ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात सर्वाधिक ६ शिक्षक आमगाव तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती बघता आमगाव तालुक्यात दररोज बाधित आढळून येत असल्याचे दिसत आहे. शिवाय आजघडीला आमगाव तालुक्यात १७ क्रियाशिल रुग्ण असून, जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आमगाव तालुका आला आहे.