गणनेचे काम पूर्ण : बुद्ध पौर्णिमला चंद्रप्रकाशात प्राण्यांवर ठेवली नजरगोंदिया : वन्यजीव संरक्षण विभागाच्या वतीने नवेगावबांध, नागझिरा, न्यू नागझिरा व कोका आदी संरक्षित वनक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री करण्यात आलेल्या वन्यप्राणी गणनेचे काम पूर्ण झाले आहे. ४ मे रोजी सुरू करण्यात आलेले हे काम ५ मे रोजी सकाळी ११ वाजता पूर्ण झाले. आता वन्यजीव प्रेमींना गणनेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. सदर वनक्षेत्रात कोणकोणत्या प्रजातीच्या वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झाली किंवा घट झाली, हे कळू शकेल. परंतु गणनेतील आकडा कळण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पहावी लागणार आहे. ४ मे रोजी सकाळी ८ वाजता वन्यजीव विभागाद्वारे ५५६ चौरस किमी वनक्षेत्रातील जलस्त्रोतांजवळ २२६ मचान बनवून वन्य प्राण्यांच्या गणनेचे कार्य करण्यात आले. दरम्यान वन कर्मचाऱ्यांसह वन्यजीव प्रेमीसुद्धा २४ तास तत्परतेने वन्यजीवांवर आपल्या नजरा लावून होते. त्यांना वन्यजीव विभागाकडून मिळालेल्या प्रपत्रात त्यांना दिसलेल्या वन्यजीवांची संख्या व हालचालींचे विवरण नमूद केले. यावर्षी वन्यजीव विभागाला गणनेत सहभागी होण्यासाठी वन्यजीव प्रेमींचे ३७० आवेदन मिळाले होते. यापैकी जवळपास ७० लोकांची निवड करण्यात आली. गणनेच्या कार्यादरम्यान अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे यासाठी वनविभागाच्या वनक्षेत्रात बनलेल्या २५ स्थायी मचानांशिवाय २०१ अस्थायी मचान बनविल्यात आल्या होत्या. त्यावर बसून वन कर्मचारी व वन्यजीव प्रेमींनी गणनेचे कार्य केले. आता दोन दिवसीय सदर अभियानाच्या निकालाकडे वन्यजीव प्रेमींच्या नजरा लागून आहेत. परंतु वन्यजीव संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, सर्व माहिती एकत्रित करून त्यांची नोंदणी करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत वन्यप्रेमींसह नागरिकांनाही वाटच पहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
दोन दिवसात वन्यप्राण्यांची संख्या होणार जाहीर
By admin | Updated: May 7, 2015 00:40 IST