टळला अनर्थ : अधिकारी व कर्मचाऱ्यांची सतर्कता गोठणगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी कुठे जास्त, तर कुठे कमी असा पाऊस बरसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिकं वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागालाही धडपड करावी लागत आहे. यातून शेतकऱ्यांसाठी सोडलेले पाणी प्रतापगडजवळ कालव्यातून फुटल्याचे लक्षात आले. यामुळे धावपळ करीत कालव्यातील पाणी बंद करण्यात आले. गोठणगाव परिसरात १८ जुलै २०१६ पासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली होती. त्यामुळे १९ जुलैला इटियाडोह मुख्य कालवा सुरू झाला. २२ जुलैला पाऊस आल्यामुळे मुख्य कालवा बंद झाला. पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे २४ जुलैला इटियाडोह मुख्य कालवा सुरू झाला. नंतर २४ जुलैला सकाळी ९ वाजता प्रतापगडचे पोलीस पाटील तथा इटियाडोह पाणी वापर संस्थेचे सचिव योगेश जनबंधू यांच्या प्रतापगडजवळ मुख्य कालव्याला छिद्र पडून पाणी बाहेर निघत आहे असे निर्देशनास आले. त्यांनी लगेच संबंधित कर्मचाऱ्याला फोन लावून कळविले. कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळताच उपविभागीय अभियंता एस.पी. राठोड यांनी त्वरित मुख्य कालवा बंद करण्यास सांगितले. कालव्याला पडलेले छिद्र पाहता पाहता मोठे होत गेले. मुख्य कालवा बंद केला नसता तर हे छिद्र अजून मोठे झाले असते. मुख्य कालव्याला ८०० क्यूसेसचा प्रवाह सुरू होता. कालवा फुटून पूर्ण पाणी बाहेर निघाले असते. प्रसंगावधान राखत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कालवा बंद केला नसता तर प्रतापगड, निमगाव, रिटी, दिनकरनगर व खोकरी या गावाच्या नाल्याच्या काठावरील पिक वाहून जीवीत हाणीही झाली असती. १८ वर्षापासून कार्यरत कालवा निरीक्षक एस.आर. ढोक यांनीही यासाठी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)
अन् फुटलेला कालवा बुजविला
By admin | Updated: July 30, 2016 00:13 IST