कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे व्यासपीठ म्हणजेच शाळांमधील वार्षिक स्नेह संमेलन होय. मात्र येथील नगर परिषदेला विद्यार्थ्यांच्या कला गुणांशी काहीच घेणे-देणे नसल्याचे दिसते. मागील २ वर्षांपासून नगर परिषद शाळांमध्ये वार्षिक स्नेह संमेलन झालेले नसून यंदाचे तिसरे वर्ष आहे. यामागे आर्थिक टंचाईचे कारण सांगीतले जात असून अन्यत्र लाखो रूपयांचा चुराडा होत असतांना विद्यार्थ्यांसाठीच पैशांची टंचाई असते काय असा सवालही आता केला जात आहे. यातून मात्र नगर परिषदेला वार्षीक स्नेह संमेलनाची ‘अॅलर्जी’ दिसून येत आहे.वर्षभर अभ्यास करतानाच काही दिवस विद्यार्थीच काय शिक्षकांचेही मनोरंजन व्हावे या दृष्टीने वार्षिक स्नेह संमेलन लाभदायी आहे. स्नेहसंमेलनातंर्गत क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धा व कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना आपल्यातील कला व गुणांना सादर करण्याची संधी मिळते. यासाठीच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याचे एक माध्यम म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन असल्याचेही बोलले जाते. मात्र नगर परिषदेला विद्यार्थ्यांच्या कला गुणांशी काहीच घेणे देणे नाही. यामुळेच मागील २ वर्षांपासून येथील नगर परिषदेच्या शाळांत वार्षिक स्नेहसंमेलन झालेले नाही. अशात नगर परिषद शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमधील कला व गुणांना वाव कसा मिळेल असा प्रश्न केला जात आहे. नगर परिषदेतील आर्थिक टंचाईचे कारण सांगीतले जात आहे. मात्र नगर परिषदेत अशी कशी आर्थिक टंचाई आली आहे की, ज्यामुळे मागील २ वर्षांपासून वार्षिक स्नेहसंमेलन घेता आले नाही असा सवाल आता विद्यार्थी व पालक आणि नगर परिषद सदस्य व कर्मचारी करीत आहेत.एकीकडे आपल्या शाळा चालविण्यासाठी नगर परिषद शाळांतील शिक्षक लोकांच्या घरी जाऊन विविध प्रकारचे आश्वासन देऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र त्याच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकडे मात्र चक्क दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत असल्याचे पालकही बोलत आहेत. विशेष म्हणजे, नगर परिषदेच्या शाळा याच कारणांमुळे खाजगी शाळांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत.विनाकारण लाखो रूपये खर्च केले जात असताना नगर परिषद मात्र विद्यार्थ्यांच्या करमणूक व त्यांच्यातील कला गुणांच्या विकासावर मोजके पैसे खर्च करण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. शैक्षणिक सत्र लोटत असताना विद्यार्थ्यांना साहीत्य पुरविण्यात आले नाही. यातून नगर परिषद शाळांप्रती किती सजग आहे याचीही प्रचिती येते. तर फक्त आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी सत्राच्या शेवटी साहीत्य पुरवठा करण्याचा घाट रचणारेही याच नगर परिषदेत बसून आहेत ही मात्र खेदाची बाब आहे.फक्त १.५० लाखांचा खर्चनगर परिषदेच्या सहा माध्यमिक शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जात होते. यासाठी या शाळांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जात होते. म्हणजेच, १.५० रूपयांचा खर्च नगर परिषदेला येत होता. मात्र सन २०१७ पासून नगर परिषदेने स्नेह संमेलनासाठी पैसे दिलेच नाही. परिणामी सन २०१७ व २०१८ मध्ये वार्षिक स्नेह संमेलन झालेच नाही. त्यात आता सन २०१९ मध्येही आतापर्यंत व काहीच हालचाली दिसून येत नाहीत. यावर्षीही नगर परिषद शाळांमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचा मुहूर्त नसल्याचे दिसत आहे.क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात माघारखाजगी शाळा आज प्रत्येकच क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रात भाग घेत असून आपल्या विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करवून घेत आहेत. हेच कारण आहे की, खाजगी शाळांतील विद्यार्थी क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रात वाखाणण्याजोगी कामगिरी करीत असून शाळेसह आपल्या शहर व पालकांचे नाव उंचावित आहेत. नगर परिषदेला मात्र काहीच घेणे देणे नसल्याने नगर परिषद शाळांतील शिक्षकही शाळेत या वर्ग घेऊन परत जा एवढाच रूटीन धरून आहेत. यामुळे मात्र अंगी कला व गुण असलेले नगर परिषद शाळांतील विद्यार्थी माघारत आहेत.
नगर परिषदेला वार्षिक स्नेह संमेलनाची ‘अॅलर्जी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST
नगर परिषदेच्या सहा माध्यमिक शाळांचे वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जात होते. यासाठी या शाळांना प्रत्येकी २५ हजार रूपये दिले जात होते. म्हणजेच, १.५० रूपयांचा खर्च नगर परिषदेला येत होता. मात्र सन २०१७ पासून नगर परिषदेने स्नेह संमेलनासाठी पैसे दिलेच नाही. परिणामी सन २०१७ व २०१८ मध्ये वार्षिक स्नेह संमेलन झालेच नाही.
नगर परिषदेला वार्षिक स्नेह संमेलनाची ‘अॅलर्जी’
ठळक मुद्देयंदाचे तिसरे वर्ष : आर्थिक टंचाईचे कारण