पोलीस निरीक्षक खांदारे : शांतता समितीच्या बैठकीत आवाहनसालेकसा : सप्टेंबर महिन्यात १ तारखेपासून विविध सणोत्सवाची रेलचेल सुरू होत आहे. या महिन्यात गणेशोत्सव व बकरी ईद सारखे दोन धर्माचे दोन मोठे उत्सव सोबतच येत आहेत. या दरम्यान सलोख्याचे वातावरण बनवून ठेवणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पोलीस विभाग शांती, सुव्यवस्था असावी म्हणून सतत प्रयत्नशील आहे, ते राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य असणे आवश्यक आहे. तरी समाजातील सर्व जवाबदार व समजदार घटकांनी यासाठी सतत सहकार्य करावे, असे आवाहन सालेकसाचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी केले आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या सभागृहात तालुकास्तरीय शांतता बैठक घेण्यात आली. या वेळी ते उपस्थितांच्या माध्यमातून तालुकावासीयांना आवाहन करीत बोलले.येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सालेकसा पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक मोहन खांदारे होते. या वेळी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, समाजसेवक, पोलीस पाटील, वकील, पत्रकार, स्वयंसेवी संगठनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.ठाणेदार खांदारे पुढे म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात पोळा, मारबत असून ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. मधात १२ सप्टेंबरला बकरी ईद आणि १५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होणार असून या दरम्यान गर्दीचा उत्साह तसेच नाच गाणे चालत असतात. अशात अनेकवेळा छोटेमोठे वादसुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते. याचा गैरफायदा घेत काही समाजकंटक शांतता भंग करण्यासाठी खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतात. शेवटी नुकसान समाजातील निर्दोष जनतेचा होतो. तथा कथीत समाजहीत साधणाऱ्यांचा पाठबळ मिळाल्यास सामाजिक व जातीय सलोखा भंग होतो. अशा वेळी जबाबदार घटकांनी प्रशासनाला मदत करीत समाजात शांतता राखण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन केले.चर्चेदरम्यान उपस्थित पदाधिकारी आणि सदस्यांनी उत्सवादरम्यान काय करावे व काय टाळावे याबद्दल सविस्तर चर्चा केली. समाजात शांतता राखण्यासाठी आपण काय काय करू शकतो, या विचारांचे आदान प्रदान उपस्थित मान्यवरांनी व सदस्यांनी केली. बैठकीला सेवानिवृत्त ए.एस.आय. मनोहर बारसे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव फुंडे, गोविंदा रहांगडाले, अॅड. पारसनाथ थरे, पत्रकार विजय मानकर, गणेश भदाडे, रमेश चुटे, जमीन अली सैयद, शोभाराम शहारे, निर्दोष साखरे, राजेंद्र भस्मोटे, आदित्य शर्मा, तुकाराम बोहरे, बबलू कटरे, विनोद जैन, राजू काळे, कुलतार सिंग भाटीया, डॉ. संजय देशमुख, मनोज शरणागत, मोहन वळतकर, योगेश फुंडे व इतर मान्यवर सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)
सुव्यवस्थेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक
By admin | Updated: September 3, 2016 00:02 IST