साठेबाजी होत असल्याचा संशय : व्यावसायिकही अडचणीत केशोरी : व्यवहारातून चिल्लर हद्दपार होत चालले आहे. यामुळे नागरिकांना व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदीमुळे अनेकांकडे दोन हजाराची नोट असून चिल्लर व्यवहारासाठी छोट्या नोटांची कमतरता भासत आहे. व्यवहार म्हटला की चिल्लरची गरज भासते. चार आणे, आठ आणे चलनातून हद्दपार झाले. एक रुपया, २ रुपयांसह ५ रुपये, १० रुपयांची नाणी चलनात आली; पण सध्या मार्केटमध्ये केवळ १० रुपयांची नाणी दिसत असून इतर नाणी, तसेच १० ते ५० रुपयांच्या नोटा मात्र बेपत्ता झाल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील किराणा व्यावसायिक, औषधी विक्रेते यांची गोची होते. त्यांना एक-दोन रुपये करता-करता दिवसाला ५० रुपयांवर नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जाते. यामुळे एक-दोन रुपयांत मिळणारी औषधीच ते विकत नसल्याचे दिसते. बाजारपेठेतील मोठे व्यापारी ही चिल्लर छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचू देत नसल्याचा आरोप केला जात आहे. सुट्या पैशांअभावी अनेकांना वस्तू खरेदीपासून मुकावे लागते. व्यवहार करताना अडचण निर्माण होतात. रिझर्व्ह बॅँकेकडून सुट्या नाण्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असतानाही सुट्या पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे सुटे पैसे जातात तरी कुठे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. काही व्यापारी या सुट्या नाण्यांचाही काळाबाजार करीत असल्याचे एका लहान व्यावसायिकाने सांगितले. १०० रुपयांना ९० रुपये, असा सुट्या नाण्यांचा काळाबाजार केला जात आहे. त्यामुळे छोट्या नोटा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
चिल्लरच्या तुटवड्यामुळे व्यवहार प्रभावित
By admin | Updated: December 29, 2016 01:29 IST