लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या देशातच कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढत चालला आहे. त्यात राज्यातील स्थिती अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त गंभीर असून, यातूनच आता केंद्र शासनाने ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी मंजुरी दिली आहे. यामुळे आता ४५ वर्षांवरील व्यक्ती ज्यांना काही व्याधी नाही तेसुद्धा कोरोनाची लस घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. जिल्ह्यातील स्थिती बघता ४० वर्षांवरील नागरिकांची संख्या ४,४८,३७५ एवढी आहे. ४५ वर्षांपासून नागरिकांची मोजणी केल्यास यातील काही नागरिक कमी होतील. मात्र तरीही एवढ्या मोठ्या संख्येत नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. शिवाय आता ४५ वर्षांवरील प्रत्येकच नागरिकाचे लसीकरण करावे लागणार असल्याने लसींची मागणीही वाढणार आहे. आतापर्यंत पुरेपूर प्रमाणात लसींचा साठा मिळत आला असल्याने लसीकरणात अडचण निर्माण झाली नाही. मात्र आता लसींची मागणी वाढणार असून त्यात पुरवठा कमी झाल्यास मात्र लसीकरणात अडचण येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सुमारे ४ लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण शासन परवानगीनुसार आता ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस द्यायची आहे. अशात जिल्ह्यातील ४० वर्षांवरील नागरिकांची संख्या ४,४८,३७५ एवढी होत आहे. यातील ४०-४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कमी केल्यानंतरही ती संख्या सुमारे ४ लाखांच्या घरात जाईल. म्हणजेच, आरोग्य विभागापुढे आता एवढ्या मोठ्या संख्येत नागरिकांच्या लसीकरणाचे आव्हान आहे.
मागणीच्या तुलनेत पुरेपूर पुरवठा जिल्ह्याला आतापर्यंत ८९,४२० डोस मिळाले आहेत व त्यामुळे लसीकरण सुरू आहे. यात मंगळवारपर्यंत जिल्ह्यात १९,०५० डोसचाच साठा होता. मात्र त्याच दिवशी आणखी ९,२५० डोस मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यात आता लसींचा साठा शिल्लक आहे. आतापर्यंत जिल्ह्याला मागणीनुसार डोस मिळाले आहेत.