गोंदिया : तिरोडा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला विशेष पोक्सो जलदगती न्यायालयाने ४ वर्षांचा सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड ठोठावला आहे. शंकर भोंडेकर (२६) रा.तिरोडा असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी शंकरने सन २०१७ मध्ये तिरोडा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. ती पीडित मुलगी आपल्या आईवडिलासोबत मधल्या खोलीमध्ये झोपली असताना, रात्री १० वाजताच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरात घुसून त्याने विनयभंग केला होता. या संदर्भात तिरोडा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२चेे कलम ८, भादंविचे कलम ३५४, ४५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलाश गवते यांनी केला होता. हे प्रकरण अतिरिक्त सहजिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष पोक्सो जलदगती न्यायालय) सुभदा डी.तुळणकर यांच्या न्यायालयात सुरू होते. या प्रकरणामध्ये अभियोजन व फिर्यादी/पीडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी आरोपी विरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी एकूण ७ साक्षीदार तपासले. यावर ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने आरोपीला कलम ४५२ अन्वये ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ३ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम ८ बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ अंतर्गत ४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास २ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगण्याचे आदेश करण्यात आले.