गोंदिया : संपूर्ण जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागलेल्या गणेशोत्सवाला शुक्रवारी मोठ्या उत्साहाने सुरूवात झाली. जिल्हाभरात यावर्षी ८४७ सार्वजनिक गणेश मंडळांकडून १० दिवसांच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. ढोलताशे आणि काही ठिकाणी डिजे लावून मिरवणुकांनी गणरायाला मंडपात आणण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या मिरवणुका सायंकाळपर्यंत सुरूच होत्या.सोबतच घराघरात गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. त्यासाठी गुरूवारपासून विक्रेत्यांच्या दुकानांवर आणि मूर्तीकारांच्या घरांमध्ये नागरिकांची गर्दी सुरू होती. पोलीस विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ४६४० घरांमध्ये गणपतीची स्थापना यावर्षी होत आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या उत्सवादरम्यान गावाची शांतता भंग होऊ नये यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात आली. जिल्ह्यात यंदा ५५६ पैकी ५१९ गावांत ही संकल्पना राबविली जात आहे. ही संकल्पना आमगाव, सालेकसा, गोंदिया शहर, रागनगर, गोंदिया ग्रामीण, रावणवाडी, गोरेगाव, तिरोडा, गंगाझरी, दवनीवाडा, डुग्गीपार, देवरी, चिचगड, अर्जुनी/मोरगाव, केशोरी, नवेगावबांध या पोलिस ठाण्यांतर्गत प्रत्यक्षात ही संकल्पना अंमलात येत आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ५१९ गावांत एक गाव एक गणपतीची संकल्पना साकारण्यास मदत झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
८४७ सार्वजनिक गणेशांची स्थापना
By admin | Updated: August 30, 2014 01:46 IST