गोंदिया : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता आरोग्य विभागाने आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत. यांतर्गत आता रुग्णांची सोय व्हावी म्हणून आणखी ८ कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार असून त्यासाठी ८ इमारतींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रत्येकच तालुक्यात हे कोविड केअर सेंटर देण्यात आले असून मंगळवारपासून हे सेंटर्स सुरू होणार आहेत.
जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून धक्कादायक बाब म्हणजे, आता ३ अंकी संख्या सुरू झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या बघता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच त्यांच्यापासून अन्य व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्यांचे अलगीकरण करण्याची गरज आहे. अशात कोविड केअर सेंटर वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच आरोग्य विभागाने जिल्ह्यात आणखी ८ कोविड केअर सेंटर प्रस्तावित केले होते. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे या ८ कोविड केअर सेंटरसाठी ८ इमारतींचे अधिग्रहण करण्यात आले असून प्रत्येकच तालुक्यात हे कोविड केअर सेंटर देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच असल्याने सर्वाधिक भार गोंदिया शहरातच पडत आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून आरोग्य विभागाने लगतच्या ग्राम फुलचूर येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे अधिग्रहण करून तेथील सेंटर सुरू केले होते. याचा फायदा मिळत असून आडघडीला तेथे २६ बाधितांना हलविण्यात आल्याची माहिती आहे. त्यात आता आणखी ८ कोविड केअर सेंटर सुरू होतील. त्यातही प्रत्येकच तालुक्यात १ कोविड केअर सेंटर देण्यात आल्याने नक्कीच त्या तालुक्यातील रुग्णांची तेथे सोय करता येणार आहे. मंगळवारपासून हे सेंटर्स सुरू होणार आहेत.
--------------------------
येथे होणार कोविड केअर सेंटर
जिल्ह्यात आणखी ८ कोविड केअर सेंटर सुरू होणार असून यासाठी इमारतींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया शहरातील जिल्हा क्रीडा संकुल, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथील जिल्हा परिषद शाळा तसेच आदिवासी मुला-मुलीचे शासकीय वसतिगृह (नवीन इमारत), देवरी तालुक्यात देवरी येथील शासकीय विश्रामगृह, सालेकसा तालुक्यात शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम केसलवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिरोडा तालुक्यातील ग्राम सरांडी येथील अनुसूचित नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, तर आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील आरोग्य उपकेंद्र येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. यात बिरसी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
---------------------------
माविम करणार रुग्णांच्या जेवणाची सोय
कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या रुग्णांच्या जेवणावरून मागील वर्षी चांगलेच वादंग झाले होते. यात एका कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. हा प्रकार यंदा घडू नये यासाठी यंदा कोविड केअर सेंटरमधील रुग्णांच्या जेवणाची सोय महिला आर्थिक विकास महामंडळाकडून केली जाणार आहे. यासाठी माविमला कंत्राट देण्यात आले असून तसे ऑर्डर देण्यात आले असल्याची माहिती आहे.