गोंदिया : वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच आपल्यात दानाची सवय सुध्दा लागली पाहिजे. दानात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. त्याचे आंतरिक समाधान जगातील मोठ्यातमोठ्या ऐश्वर्यापेक्षा जास्त मोलाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी केले.जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत शुक्रवारी (दि.७) ऐच्छिक रक्तदान शिबिर पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्वत: सीईओ शिंदे यांच्यासह एकूण ७३ जणांनी रक्तदान केले.जिल्ह्यात १४ नोव्हेंबर बालकदिन ते १९ नोव्हेंबर जागतिक स्वच्छता दिन साजरा करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद आणि बाई गंगाबाई रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केवळ रक्तदानाचा आकडा वाढविण्यावर आपला विश्वास नाही तर रक्तदानाची सवय लागली पाहिजे हा आपला मुख्य हेतु आहे असे सांगून रक्तदान करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी मनातील भिती घालवून आज पहिल्यांदाच रक्तदान केले, हीच आपल्यासाठी सर्वात मोठी बाब असल्याचे मत व्यक्त यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले. या शिबिरात जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेवून मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. बांधकाम विभागातील महिला कर्मचारी गायत्री लाचुरे यांच्या रक्तदानाने शिबिराला सुरूवात करण्यात आली. रक्तपेढीच्या रक्तसंकलन अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी तथा त्यांच्या चमूने रक्तसंकलनाचे कार्य केले. शिबिरस्थळाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर, उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा परिषद सदस्य पंचम बिसेन, उमाकांत ढेंगे, सिताताई रहांगडाले, कल्याणी कटरे, उषा हर्षे यांनी भेट देवून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल.पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व्ही.एल.राठोड, जिल्हा आरोग्य अधकिारी डॉ.हरिश कळमकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप लोखंडे, कार्यकारी अभियंता उ.ना. वाकोडीकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राम चव्हाण, सडक/अर्जुनीचे गटविकास अधिकारी धांडे, गोंदियाचे गटविकास अधिकारी वालकर, अर्जुनी/मोरगावचे गटविकास अधिकारी कोरडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे कक्षाधिकारी जी.एस. पवार, अधीक्षक प्र.ग. शहारे, विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांसह ७३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान
By admin | Updated: November 8, 2014 22:39 IST