प्रस्तावांना आला वेग : कर्ज व व्याजाची रक्कम ९२.९३१ लाखांत गोंदिया : कर्जमाफी योजनेंतर्गत सावकारांकडून मागविण्यात आलेल्या प्रस्तावांत दुपटीने वाढ झाली असून त्यांच्या आकडा आता ७०० वर पोहोचला आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात फक्त ३७४ प्रस्ताव सावकारांकडून प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांकडून मिळाली होती. यावर लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. त्यानंतर आठवड्यातच प्रस्तावांची संख्या ७०० वर पोहोचली. यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. सततच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर विदर्भ व मराठवाडा या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. खासगी सावकारांकडील कर्ज हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील प्रमुख कारण असल्याचे विविध समितींच्या अहवालांतून पुढे आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागात मोडत असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी किंवा त्यांच्या कुंटुबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जमाफीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर या योजनेंतर्गत परवानाधारक सावकाराने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व व्याजाच्या तपशिलासह विहित नमुन्यात संबंधीत तालुक्याचे सहकारी संस्थांचे सहायक निबंधक यांच्याकडे प्रस्ताव सादर करावयाचे आहे. मात्र जिल्ह्यात ३० मे पर्यंत तिरोडा व देवरी तालुक्यातून फक्त ३७४ प्रस्ताव प्राप्त झाले होते. सावकार व शेतकरी दोघांसाठी अत्यंत लाभदायी या योजनेबाबत लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकत सावकारांना प्रस्ताव सादर करण्यासदंर्भात आवाहन केले होते. याचेच परिणाम म्हणता येणार की, शनिवारपर्यंत (दि.६) प्रस्तावांत दुपटीने वाढ झाली असून ७०० प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उप निबंधकांनी दिली. (शहर प्रतिनिधी)प्रस्ताव सादर करण्यास सावकार उदासीनजिल्ह्यात २०१ परवानाधारक सावकार आहेत. असे असताना फक्त ३२ सावकारांकडून हे ७०० प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. यात तिरोडा तालुक्यातील २५ पैकी १४ सावकारांकडून १५५ प्रस्ताव असून कर्ज व व्याज मिळून ११.९४२ लाख रूपये आहेत. देवरी तालुक्यातील २६ पैकी फक्त ४ सावकारांचे ५४.६२ लाखांचे २६२ प्रस्ताव आहेत. तर यंदा अर्जुनी -मोरगाव तालुक्यातील प्रस्तावही आले असून यात २५ पैकी १४ सावकारांनी २६.३६९ लाख रूपयांचे २८३ प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्ज व व्याजाच्या रकमेत वाढ झाली असून आता ९२.९३१ लाखांत ही रक्कम गेली आहे.
३२ सावकारांचे ७०० प्रस्ताव
By admin | Updated: June 7, 2015 01:40 IST