२५० जणांची माघार : जिल्हा परिषदचे २१६ तर पंचायत समितीचे ३९९ उमेदवार रिंगणातगोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत सोमवारी संपल्यानंतरआता जिल्हा परिषदेच्या ५३ जागांसाठी २१५ तर पंचायत समिती गणांच्या १०६ जागांसाठी ३९९ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांना निवडणूक चिन्हांचेही वाटप झाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे.सोमवारी रात्री ९ पर्यंत किती उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली याचे चित्र प्रशासनाकूडन स्पष्ट करण्यात आले नव्हते. जे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यांना चिन्ह वाटपाचे कामही सोमवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. यात प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना यांच्यासह रिपाई, मनसे, समाजवादी पार्टीच्या प्रत्येकी एका उमेदवारासह तीन इतर पक्षांचे आणि ४३ अपक्ष उमेदवार आहेत.विशेष म्हणजे भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाल्याचे दिसून आले. त्याखालोखाल काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरीचे प्रमाण आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ मतदार संघांपैकी गोंदिया तालुक्यातील कामठा आणि आसोली तर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा या मतदार संघांमध्ये काही लोकांनी नामांकन रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे त्यातील बहुतांश लोकांचे नामांकन वैध ठरविण्यात आले. त्यांना नामांकन मागे घेण्याची मुदत बुधवारी (दि.२४) देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे हे तीन मतदार संघ तसेच पंचायत समित्यांच्या ६ मतदार संघांतील उमेदवारांना अद्याप चिन्हवाटप करण्यात आलेले नाही. बुधवारी सायंकाळी त्यांना चिन्हांचे वाटप केले जाईल. आक्षेप घेतलेल्या पंचायत समितीच्या मतदार संघात गोंदिया तालुक्यातील पांजरा, नवेगाव, धापेवाडा, घिवारी, तिरोडा तालुक्यातील चिखली आणि सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा या मतदार संघांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी सर्वाधिक १४ जागा गोंदिया तालुक्यात आहेत. त्यामुळे येथे उमेदवारही सर्वाधिक ५० आहेत. तर सर्वात कमी ४ जागा असलेल्या सालेकसा तालुक्यात १८ उमेदवार रिंगणात आहेत.मतमोजणी भंडाऱ्यासोबत ६ जुलैला होणारगोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या ८ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ६ जुलै रोजी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक विभागाकडून देण्यात आली. ४ जून रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार गोंदिया व भंडारा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांसाठी ३० जून रोजी मतदान आणि २ जुलै रोजी मतमोजणी होणार होती. न्यायालयीन प्रकरणानंतर भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४ जुैल रोजी मतदान व ६ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. ४गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या सीमा एकमेकांना लागून आहे. परिणामी गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक निकालांचा भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समित्याच्या निकालावर प्रभाव पडू शकतो त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे ६ जुलै रोजी होणार आहे.