१.६० कोटींची आवक : योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढगोंदिया : स्थायी तत्त्वावर वीज जोडणी खंडीत करण्यात आलेल्या पाच हजार ३९८ ग्राहकांनी महावितरणच्या ‘नवप्रकाश’ योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत या ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकीचा भरणा केला असून त्यांची जोडणी पुन्हा करण्यात आली आहे. याअंतर्गत महावितरणला या ग्राहकांकडून एक कोटी ६० लाख ९६ हजार रूपयांची आवक झाली आहे. महावितरणकडून अवघ्या राज्यात १ नोव्हेंबर २०१६ पासून ‘नवप्रकाश’ योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत बीलाचा भरणा न केल्याने वीज पुरवठा खंडीत आलेल्या ग्राहकांना पुन्हा जोडणी दिली जाते. अगोदर ३० एप्रिल पर्यंत ही योजना राबविली जाणार होती. मात्र योजनेला मिळता प्रतिसाद बघता महावितरणकडून आता या योजनेला येत्या ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोंिदया परिमंडळांतर्गत ५७ हजार ५७६ ग्राहकांवर सुमारे ३१ कोटी ७८ लाख रूपयांची थकबाकी होती. यात २७ कोटी ४१ लाख रूपये मुळ बाकी असून चार कोटी ३७ लाख रूपये व्याजाचे आहेत. यामध्ये ४९ हजार ८२० घरगुती ग्राहकांवर १८ कोटी ७२ लाख रूपये, वाणिज्यीक क्षेत्रातील पाच हजार ५३६ ग्राहकांवर चार कोटी ३९ लाख रूपये, एक हजार ४१६ औद्योगीक ग्राहकांवर तीन कोटी ५१ लाख रूपये, सार्वजनिक सेवेवर १८ लाख रूपये, अस्थायी कनेक्शन धारकांवर १६ लाख रूपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळेच अशा ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले होते. विशेष म्हणजे या योजनेत भाग घेणाऱ्या ग्राहकांचे पूर्ण व्याज माफ केले जात आहे. तसेच या योजनेत स्थायी स्वरूपात वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या कृषी पंप व सार्वजनीक नळ योजनांचा समावेश नसून उर्वरीत सर्व उच्च व लघुदाब वीज कनेक्शनधारक भाग घेऊ शकतील. (शहर प्रतिनिधी) - अशा प्रकारे मिळणार लाभ या योजनेंतर्गत अगोदरच्या तीन महिन्यांत मूळ थकबाकी भरल्यास व्याज व त्यावरील विलंब शुल्क शंभर टक्के माफ केले जाईल. तीन ते सहा महिन्यांपर्यंत मुळ थकबाकी व २५ टक्के व्याज भरल्यास ७५ टक्के व्याज व विलंब शुल्क शंभर टक्के माफ केले जाईल. विशेष म्हणजे थकबाकी भरणाऱ्या ग्राहकाला या योजनेंतर्गत त्वरीत जोडणी दिली जाणार आहे. त्यासाठी डिपॉजिट, सर्व्हिस चार्जेस, रिकनेक्शन चार्जेस यात सूट दिली जाईल. ३१ जुलैपर्यंत विलंब शुल्क माफ ही योजना पूर्वी १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ या तीन महिन्यांसाठी होती. मात्र मिळत असलेला प्रतिसाद बघता योजना ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेंतर्गत ३० एप्रिल पर्यंत मुळ रक्कम भरल्यास शंभर टक्के व्याज व विलंब शुल्क माफ केले जाईल. १ मे ते ३१ जुलै पर्यंत मुळ रक्कम सहीत व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरीत ७५ टक्के व्याजासहीत शंभर टक्के विलंब शुल्क माफ केले जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
५३९८ वीज ग्राहकांनी घेतला ‘नवप्रकाश’चा लाभ
By admin | Updated: March 21, 2017 00:59 IST