गोंदिया : नगरपरिषदेच्या मालमत्ता कर वसुली सोबतच आता बाजार विभागाने भाडे वसुलीसाठी आपली कंबर कसली असून सोमवारी दुकान व गोदामाला सील ठाेकल्यानंतर आता बुधवारी (दि.२७) आणखी ३ दुकानांना सील ठोकले. या भाडेकरूंवर ३ लाख ७ हजार ५९ रूपयांची थकबाकी आहे.
मालमत्ता कर वसुली करताना पथकाकडून थेट कारवाई केली जात असल्याने थकबाकीदारांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. आता त्यात नगरपरिषदेच्या मालकीच्या दुकानांचे भाडे मोठ्या प्रमाणात थकून असल्याने बाजार विभागानेही आपली कंबर कसली आहे. मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी बाजार विभागालाही वसुली करा अन्यथा कारवाई करा असे आदेश दिले आहेत. त्यानुसार, बाजार विभागाने सोमवारी शहरात एक दुकान व गोदाम सील केले होते. त्यानंतर आता बुधवारी (दि.२७) वसुलीची मोहीम छेडली.
यामध्ये पथकाने शहरातील लोहा लाईनमधील नगरपरिषदेच्या मालकीच्या दुकानातील भाडेकरून नोतमदास आसवानी यांच्या नावावर असलेल्या दुकान क्रमांक ३ व ७ ला सील ठोकले. आसवानी यांच्यावर दोन्ही दुकानांचे सन २०१७ पासूनचे २ लाख ६० हजार २२४ रूपयांचे भाडे थकून आहे. तर त्यानंतर जाली शेडमध्ये असलेल्या भाडेकरू चुन्नीलाल अमृते यांचे दुकानाला सील ठोकले. त्यांच्यावर सन २०१७ पासून ४६ हजार ८३५ रूपयांचे भाडे थकून आहे. या कारवायांमुळे आता दुकान भाडेकरूंची अडचण वाढत असून ही कारवाई बाजार निरीक्षक मुकेश मिश्रा, अजय मिश्रा, सुधीर भैरव, विरेंद्र उघडे, टिकाराम मेश्राम यांनी केली.