गोंदिया : प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी आणि शेतकरी व इतर नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून डिजिटलायझेशनवर अधिक भर दिला आहे. यासाठीच शासनाने राज्यातील मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी निधीदेखील मंजूर केला आहे. या निर्णयांतर्गत जिल्ह्यातील २०३ तलाठी आणि ३३ मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे लॅपटॉप आणि प्रिटंर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना त्यांचे काम अधिक गतिमान करण्यास मदत होणार आहे. डिजिटल इंडिया लॅण्ड रेकाॅर्ड मॉडर्नायझेशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या लॅपटाॅपची क्लाऊड सर्व्हरबरोबर जोडणी करण्याचे काम केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन सात-बारा, गाव नमुना आठ, शास्ती आदी त्वरित देण्यास तलाठ्यांना मदत होणार आहे. ई-महाभूमी अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील २०३ तलाठी आणि ३३ मंडळ अधिकारी यांना नवीन लॅपटॉप आणि प्रिंटर देण्यात येणार आहे. यासाठी खरेदीची प्रक्रिया राबविली जात असून, येत्या महिनाभराच्या कालावधीत तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या हातात नवीन लॅपटॉप पडणार असल्याचे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
......
पूर्वीच्या लॅपटॉपचे काय
जिल्ह्यातील दीडशेवर तलाठ्यांना सन २०१४-१५ मध्ये लॅपटॉप देण्यात आले होते. मात्र, यापैकी बरेच लॅपटॉप हे सध्या नादुरुस्त असून, ते काम करीत नाहीत. तर बऱ्याच लॅपटॉपचे डिस्पलेसुद्धा काम करीत नसल्याने ते सध्या बंद पडले आहे. याची तक्रारसुद्धा तलाठ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळेच आता त्यांना नवीन लॅपटॉप देण्यात येणार आहे.
- शासनाने पाच-सहा वर्षांपूर्वी दिलेले लॅपटाॅप सध्या काम करीत नसून ते बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन सात-बारा आणि इतर कागदपत्रे देण्यास अडचण निर्माण होत असल्याचे तलाठ्यांनी सांगितले.
......
नवीन लॅपटॉप मिळणारे मंडळ अधिकारी -३३
नवीन लॅपटॉप मिळणारे तलाठी -२०३
...................
तलाठी म्हणतात
शासनाने दिलेल्या लॅपटॉपमुळे कामाला बऱ्याच प्रमाणात गती आली होती. यामुळे शेतकऱ्यांना १० मिनिटांत सात-बारा, गाव नमुना आठ तसेच इतर कागदपत्रे देणे शक्य होत होते. सोबत लॅपटॉप राहत असल्याने बाहेरगावी असल्यावरसुद्धा शेतकऱ्यांना कागदपत्रे देण्यास मदत होत होती. लॅपटॉपमुळे कामाचा ताणसुद्धा कमी झाला होता.
- ए. बी. कापसे, तलाठी कटंगी
.......
महसूलसंदर्भातील सर्व रेकाॅर्ड, साता-बारा, गाव नमुना आठ आणि इतर सर्व रेकाॅर्ड लॅपटॉपमुळे ऑनलाइन उपलब्ध राहत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उपयोगी पडणारी कागदपत्रे दहा ते पंधरा मिनिटांत देणे शक्य होत होते. शिवाय त्यांना एकाच कामासाठी वारंवार पायपीटसुद्धा करावी लागत नव्हती. एकदंरीत लॅपटॉपमुळे तलाठी आणि शेतकरी या दोघांचे काम सोपे झाले होते.
.......
तालुकानिहाय लॅपटॉपची मागणी
गोंदिया - तलाठी ५०, मंडळ अधिकारी ७
गोरेगाव - तलाठी ३५, मंडळ अधिकारी ३
तिरोडा - तलाठी ४०, मंडळ अधिकारी ५
अर्जुनी मोरगाव - तलाठी ३५, मंडळ अधिकारी ४
देवरी - तलाठी ३०, मंडळ अधिकारी ३
आमगाव - तलाठी ३५, मंडळ अधिकारी ४
सालेकसा - तलाठी ३०, मंडळ अधिकारी ३
सडक अर्जुनी - तलाठी ३०, मंडळ अधिकारी ३
.....................