लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि.४) सुरू होत आहेत. यासाठी जिल्ह्यात २१५ केंद्र स्थापन करण्यात आले असून या केंद्रावरुन एकूण २० हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. परीक्षा केंद्रावर सुरळीत परीक्षा पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा महाविद्यालये बंद होती. तर मागील वर्षी परीक्षा रद्द करीत विद्यार्थ्यांना सरासरी गुण देत उत्तीर्ण करण्यात आले होते. तर दोन वर्षांपासून ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय सुटलेली आहे. त्यासाठी १०० गुणांच्या पेपरसाठी यंदा साडेतीन तासाचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असला तरी सर्वच परीक्षा केंद्रावर थर्मल स्कॅनिग व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व परीक्षा केंद्राना देण्यात आल्या आहे. बारावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत असून यासाठी २१५ परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या परीक्षा केंद्रावरुन एकूण २० हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभाग देखील सज्ज झाला आहे.
विद्यालयातच परीक्षा केंद्र - कोरोनाचा प्रादुर्भाव आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप लक्षात घेता परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदा शिक्षण विभागाने ज्या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्याच विद्यालयात दिले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात यंदा जवळपास १५० परीक्षा केंद्र वाढविण्यात आले आहे. एसटीचा दिलासा नाहीच- शुक्रवारपासून सुरु होणारी बारावीची परीक्षा लक्षात घेऊन गोंदिया आगाराने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरु करण्याची मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून केली जात होती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मागे झाला नसल्याने परीक्षेच्या कालावधीतही विद्यार्थ्यांना एसटीचा दिलासा मिळाला नाही. विद्यार्थ्यांनो तणावमुक्त वातावरणात द्या परीक्षा - मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाईन वर्ग सुरू होते. तर मागील वर्षी परीक्षा सुध्दा रद्द झाल्या होत्या. तर यंदा ऑफलाईन परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर थोडे दडपण देखील आहे. मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कुठालाही तणाव न बाळगता परीक्षा द्यावी.