काळ्या पैशाची अशीही विल्हेवाट : तिरोडा बाजार समितीमधील प्रकारगोंदिया : शासनाने १००० व ५०० रूपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे त्या पैसांच्या माध्यमातून साठविलेल्या काळ्या पैशाची विल्हेवाट लावणे कठिण झाले आहे. परंतु तिरोड्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या धान पिकांचे चुकारे चक्क जबरीने १००० व ५०० रूपयांच्या नोटांनी केले जात असल्याचा प्रकार घडत घडत आहे. शासनाने १००० व ५०० रूपयांच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे तिरोडा शहरातील कोणताही दुकानदार व व्यावसायिक त्या नोटा स्वीकारत नाही. मात्र तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दलाल आधीचेच सक्रीय झाले आहेत. आपल्या नोटा खपविण्यासाठी व्यापारी या दलालांना १००० व ५०० रूपयांच्या नोटा देत आहेत. शक्यतो त्यात दलालांचे मोठे कमिशन असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर हे दलाल शेतकऱ्यांना धानपिकाचा चुकारा म्हणून या नोटा वाटप करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. मात्र जबरण या नोटा त्यांच्या माथी मारल्या जात आहेत. साठविलेल्या काळ्या धनाची अशी विल्हेवाट लावली जात आहे.गरीब शेतकऱ्यांना पैशाची टंचाई असल्याने या नोटा स्वीकारण्याशिवाय त्यावेळी त्यांच्याकडे पर्याय नसतो. कुठून तरी चिल्लर होईल या आशेने शेतकऱ्यांनी सदर नोटा स्वीकारल्या आहेत. यानंतर शेतकरी याच नोटा घेवून अनेक किराणा दुकानात गरजेचा सामान-साहित्य घेण्यासाठी गेले. मात्र दुकानदारांनीसुद्धा त्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. तसेच सदर दुकानदारांनी हा प्रकार लोकमत प्रतिनिधीकडे मांडला. शेतकरीवर्ग धानाच्या चुकाऱ्याचे मिळालेले १००० व ५०० रूपयांचे नोट घेवून मोठ्या प्रमाणात तिरोडा शहरातील अनेक दुकानांत फिरत आहेत. मात्र त्या नोटा स्वीकारण्यास कुणीही तयार नाहीत.शासनाने ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये या नोटा स्वीकारल्या जातील असे सांगितले आहे. शिवाय ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा करणाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे फर्मान काढले आहे. त्यामुळे या मोठ्या नोटांची साठवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. त्याच काळ्याधनाची विल्हेवाट अशा मार्गाने लावून व्यापारी आता शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत. यात दोन्ही बाजूंनी शेतकरीच भरडला जात आहे. धान विकून पैसा घेतला नाही तर जीवनाच्या गरजा भागविणे कठिण, पैसा घेतला तर १००० व ५०० च्या नोटा खपविणे कठिण, बँकेत जमा करण्यासाठी गेले तर संपूर्ण दिवस खराब, धान विकलेच नाही तर आर्थिक चणचण, त्यामुळे काय करावे व काय नाही, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडले आहेत. या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांना चुकाऱ्याच्या नावे १००० व ५०० च्या नोटा देणाऱ्या दलाल व व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांनी तक्रार करावी या प्रकाराबाबत तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक चिंतामन रहांगडाले यांच्याशी संपर्क साधला असता, एखादा व्यापारी किंवा अडत्याने धानपिकाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना १००० किंवा ५०० रूपयांच्या नोटा दिल्या असतील तर त्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तक्रार करावी, असे सांगितले. मात्र ही बाब त्यांच्या निदर्शनास आली नसल्याचे ते बोलले.
शेतकऱ्यांना थोपवितात १००० व ५०० च्या नोटा
By admin | Updated: November 17, 2016 00:23 IST