प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर कंपनीचे पाऊल : दोन्ही जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष
गोंदिया : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आईनॉक्स कंपनीच्या संचालकांशी चर्चा केली. त्यानंतर सोमवारी १० टन लिक्विड ऑक्सिजन जिल्ह्याला प्राप्त झाले होते. बुधवारी पुन्हा भिलाई येथून १० टन लिक्विड ऑक्सिजन प्राप्त झाले.
कोराेनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने ऑक़्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी मेडिकलच्या आवारात १३ हजार मेट्रिक टनचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. हे कामदेखील लवकर पूर्ण व्हावे यासाठी खा. पटेल यांनी अदानी वीज प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र तोपर्यंत जिल्ह्याला नियमित ऑक्सिजनचा पुरवठा होत राहावा यासाठी खा. पटेल सातत्याने प्रयत्नरत आहे. माजी आ. राजेंद्र जैन हेसुध्दा दोन्ही जिल्ह्यातील परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत. लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या आईनॉक्स कंपनीने सातत्याने जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा विश्वास खा. प्रफुल्ल पटेल यांच्याशी झालेल्या चर्चेत व्यक्त केला. त्यानंतर बुधवारीसुध्दा याच कंपनीचे भिलाईवरून १० टन लिक्विड ऑक्सिजन घेऊन टँकर क्रमांक एमएच ४०, एन ४९५८ गोंदिया येथे दाखल झाला. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन टँक लावण्याकरिता नैसर्गिक आपत्ती निधीतून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंत्री विजय वड्डेटीवार यांच्यासोबतसुध्दा चर्चा करून त्यांना पत्रसुध्दा दिले आहे. तसेच तालुकास्तरावर कोविड रुग्णांसाठी बेड्ची संख्या वाढविण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशीसुध्दा ते संपर्कात आहेत. दोन्ही जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे संपूर्ण लक्ष असून आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहेत.