कारवाई थंडबस्त्यात : पोलीस म्हणतात कोणतीच लिंक नाही गोंदिया : तिरोडा येथील गांधी वार्डात एका घरावर धाड घालून आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या व लावणाऱ्या गँगचा पर्दाफाश केला होता. यात आठ आरोपींना तिरोडा पोलिसांनी अटक केले होते व दोघे फरार झाले होते. दुसऱ्या दिवशी त्या दोघांना अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ‘त्या’ १० आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली. सोमवारी (दि.१७) रात्री तिरोड्याच्या गांधी वार्डात आयपीएल क्रिकेटवर सट्टा घेणे व लावणे सुरू होते. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी धाड घालून आठ जणांना अटक केले होते. यात हुडराज रोहडा, नौशाद करीम शेख, जुनेद अजीज जव्हेरी, फरहान अमीन जव्हेरी, अब्दुल रफीक शेख, ठाकूर प्रकाश मेहरचंदानी, संकेत संजय काळे, रूचीर दत्तात्रय देशमुख यांचा समावेश होता. त्यावेळी या प्रकरणातील राम सनपाल व इमरान दानेवाला हे दोघे फरार झाले होते. मात्र दुसऱ्या दिवसीच पोलिसांनी त्यांचा शोध घेवून त्यांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सात मोबाईल, एक टीव्ही, होमथिएटर, सेटटॉप बॉक्स व रोख असा एकूण ६३ हजारांचा माल जप्त केला होता. म्हणून आरोपींना मिळाला जामीन ठाणेदार संदीप कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टा तिरोडा येथेच सुरू होता. त्याची लिंक स्थानिक परिसरातच होती. सदर गुन्हाची शिक्षा सात वर्षांपेक्षा कमी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी मिळू शकत नव्हती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने सर्व १० आरोपींना जामीनावर सोडण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र सदर आरोपी मोठे व्यावसायिक किंवा मोठ्या व्यापाऱ्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी न देता जामीनावर सोडण्यात आले, अशी शंका वर्तविली जात असून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
आयपीएल सट्टा खेळणाऱ्या ‘त्या’ १० जणांना जामीन
By admin | Updated: April 22, 2017 02:37 IST