गोंदिया : अवैधरित्या दारू गाळली जात असल्याच्या माहितीवरून तिरोडा पोलिसांनी चार ठिकाणी धाड घालून मोठ्या प्रमाणात मोहफूल सडवा जप्त केला आहे. तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्ड येथे शनिवारी (दि.३०) सकाळी ११ वाजेदरम्यान ही कारवाई केली आहे. यात नऊ लाख ९६ हजार ५५० रुपयांचा मोहफूल सडवा जप्त करण्यात आला आहे.
तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्डातील काही लोक मोहफुलाची दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी चार पथक तयार करून धाडसत्र राबविले. यात, आरोपी वनमाला भीमराव झाडे (वय ६५) हिच्याकडे १३०० किलो मोहफूल (किंमत एक लाख चार हजार रुपये) माल मिळून आला. शामराव श्रीराम झाडे (८५) याच्याकडे १७०० किलो मोहफूल (किंमत एक लाख ३६ हजार रुपये) माल मिळून आला. अनिल कुवरदास बिंझाडे (७०) याच्याकडे १४०० किलो सडवा मोहफूल (किंमत एक लाख १२ हजार रुपये) माल मिळून आला. तर सुरज प्रकाश बरीयेकर याच्याकडून ८००० किलो मोहफूल सडवा ( किंमत सहा लाख ४० हजार रुपये) माल व दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सहायक पोलीस निरीक्षक हनुवते, पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, सहायक फौजदार जांभूळकर, पोलीस हवालदार दामले, चेटुले, पोलीस नाईक थेर, सव्वालाखे, बरवैय्या, कटरे, बर्वे, पोलीस शिपाई दमाहे, अंबुले, लांडगे, महिला पोलीस, नान्हे, बावनथडे यांनी केली.